You are currently viewing गणेश चतुर्थी काळात कार्यक्रमासाठी परवानगी न मिळाल्यास जनआंदोलन

गणेश चतुर्थी काळात कार्यक्रमासाठी परवानगी न मिळाल्यास जनआंदोलन

प्रांताधिकारी यांची भेट घेत लोक कलाकारांसह प्रकाश पारकर यांचा इशारा

कणकवली

कोकणातील लोक कलाकारांवर कोविड – १९ प्रादुर्भाव कालावधीमध्ये मागील दोन वर्ष उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही त्यामध्ये भजन ,कीर्तनकार ,दशावतार, मृदुंगमणी, गोंधळी ,शक्ती तुरा, नमन यासारखे सर्वच लोककलाकार कार्यक्रम बंद असल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी कणकवली प्रांत वैशाली राजमाने यांना निवेदन देत पुढील काळात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या दरम्यान कार्यक्रमासाठी आम्हाला परवानगी मिळावी. शासनाने याचा गांभीर्याने विचार न केल्यास संपूर्ण कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात आपण जनआंदोलन उभारणार असल्याचे कणकवली भजन संस्था अध्यक्ष अध्यात्मिक समन्वय आघाडी कोकण संघटक तथा कणकवली पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर यांनी सांगितले.

यावेळी वारकरी संप्रदाय अध्यक्ष विश्वनाथ गोंडळकर, गोधळी रामचंद्र पाचगे, वारकरी प्रकाश सावंत,व मिलिंद लाड, बाबू दळवी, संकेत पवार, अभिषेक शिरसाट, श्याम तांबे, निलेश ठाकूर, श्रीकांत शिरसाट उपस्थित होते.यावेळी भजनी, दशावतार, गोंधळी, व इतरही लोक कलाकार उपस्थित होते. प्रांताधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात ते म्हणतात,कोकणातील पारंपारीक कला भजन, दशावतार, शक्ती तुरा, नमन, किर्तन, गोंधळ, गझल, मृदुंगवादन, कळसुत्री बाहुल्या आदी विविध लोककला जनसमुदायासमोर सादर करणे हेच सर्व लोककलाकारांचे उपजिविकेचे साधन आहे. अस असताना गेल्या दोन वर्षाच्या टाळेबंदी काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा सहकार्य आम्हा कलाकारांना न मिळाल्याने संपुर्ण कलाकार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी याचा शासनस्तरावर गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे. कारण कलाकार हा फक्त कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत असतो. लोककलाकार कलेच्या माध्यमातून उपजिविका चालवतोच. पण त्याचबरोबर कोकण संस्कृती, परंपरा रक्षण व संवर्धनाचे मौलिक काम करून महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक उन्नती साधत असतो.कोविड नियमांच्या अधिन राहून कुठल्याही कलाकाराने शासनाचे नियम तोडलेले नाहीत. कला जनमाणसासमोर सादर करायची असते. टाळे बंदीमुळे दुसरा पर्याय कलाकाराजवळ राहीलेला नाही. अशा परिस्थितीत सर्व कलाकारांवर उपासमारीची पाळी येऊन कलाकार कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. कोकणातील लोककलाकारांचा मोठा वर्ग शासनाकडून पुर्णत: दुर्लक्षित राहीला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा मोठा उत्सव असल्याने भजनी कला तसेच इतर कला सादर करण्यास परवानगी मिळावी व शासनदरबारी लोककलाकारांच्या व्यथा समजून मदतीबाबत गांभिर्याने विचार केला जावा व १५ ऑगष्ट २०२१ पर्यंत ठोस असा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. तसे न झाल्यास तमाम कलाकारांच्यातीने रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा प्रकाश पारकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 9 =