पेगासस प्रकरणावरून संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे प्रकरण लावून धरले आहे. काही गोंधळी सदस्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवर आणि मीडिया गॅलरीच्या दिशेने कागद फेकले. संसदेत जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. वारंवार संसदेचं कामकाज तहकूब करावं लागत असल्याने 10 गोंधळी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडून आणण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासूनच विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभेत पेगासस प्रकरणावरून गोंधळ घातला. पेगासस प्रकरणावर चर्चा घडवून आणण्याची विरोधकांची मागणी आहे. तर सरकारने ही चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातल्याने दोनदा दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत तर विरोधकांनी वेलमध्ये उतरून थेट लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले. काही सदस्यांनी मीडिया गॅलरीच्या दिशेने कागदं उधळून जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाल्याने कामकाज 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. तर राज्यसभेचं कामकाज उद्या गुरुवार 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
सभागृहात खासदारांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. आज सकाळी तर काही सदस्यांनी थेट अध्यक्षांवरच कागदांची उधळण केली. त्यामुळे या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. सुमारे 10 खासदारांना निलंबित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आज विरोधकांची पार्लमेंट चेंबरमध्ये एक बैठक पार पडली होती. यावेळी पेगाससच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचा निर्धार विरोधकांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला.