You are currently viewing महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा ६१ वा वाढदिवस अभिष्टचिंतन…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा ६१ वा वाढदिवस अभिष्टचिंतन…

महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने शिवाजी पार्कच्या मैदानावर शपथ घेतली आणि प्रथमच ठाकरे घराण्यातील व्यक्ती संविधानिक पदावर स्थानापन्न झाली. उद्धव ठाकरेंचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. शिवसेनेचे संस्थापक दैवत स्व.बाळासाहेब आणि स्व. सौ.मीनाताई ठाकरेंचे चिरंजीव असून प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरेंचा त्यांना समृद्ध वारसा लाभलेला आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् मधून पदवी घेतलेले उद्धव ठाकरे यांची छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांची दखल अनेकदा नामवंत मासिकांनी घेतलेली आहे.
स्व. बाळासाहेबांचे चिरंजीव असल्याने बालपणापासून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळालेले होतेच. विध्यार्थी दिशेपासून ते राजकारणात सक्रिय होते. १९९७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आणि ती त्यांनी यशस्वीरीत्यापार पाडत महानगरपालिकेवर भगवा फडकवला होता. त्यांच्या नेतृत्व गुणांची ओळख होताच स्व. बाळासाहेबांनी २००३ मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंकडे महत्वपूर्ण जबाबदारी दिली आणि २००४ मध्येच शिवसेनेची संपूर्ण धुराच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवित आपला उत्तराधिकारी घोषित केले. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्या बरोबरीने राजकारणात त्यांना साथ देतात. मुलगे आदित्य व तेजस हे दोघे असून आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातुन निवडून येऊन मंत्रिपद विराजमान आहेत.
शिवसेनाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेला आधुनिकतेशी जोडत सर्वसमावेशक करताना युवक, कामगार, शेतकरी यांच्यासाठी राज्यभर आंदोलने करत यश मिळविले. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकमध्ये घेतली गेली आहे. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंना औषध पुरवठा केला आहे. मुंबईतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी रुग्णालयांची निर्मिती केली आहे. रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी केली आहे. शेतकरी कल्याणावर भर देत त्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि राज्याने त्यांचे नेतृत्व स्वीकारले. संवेदनशील लेखक, कवी, छायाचित्रकार आणि अभ्यासू असलेल्या उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या राजकारणात महत्त्वाचे बदल घडवून आणत पक्ष संघटना सुसंघटित केली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार आणण्यात उद्धव ठाकरेंचं मोठं यश आहे. तिन्ही पक्षांची मोट बांधत विरोधकांना शिंगावर घेत मोठ्या हुशारीने आणि कल्पकतेने सरकार चालवीत असून राज्याला प्रगतीकडे नेत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर देशावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले. महाराष्ट्रात ते सर्वात जास्त पसरले. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात कहर केला. परंतु कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेले उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे संकट पेलत राज्याचा गाडा समर्थपणे हाकत आपल्या हुषारीची चुणूक दाखवून दिली. कोरोनाच्या संकटात मातब्बर नेत्यांना जमणार नाही असे कौशल्य दाखवत महाराष्ट्राने कोरोनाशी संघर्ष केला तो उद्धव ठाकरेंच्या अचूक निर्णयक्षमतेमुळेच. त्यांनी हॉस्पिटल उभारणी, डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता आणि आरोग्याच्या सुविधांची योग्य ती काळजी घेत उत्तमरीत्या प्रशासकीय बाबी हाताळल्या आहेत. राज्यातील डॉक्टर इत्यादी कोरोना योद्द्यांना आणि जनतेला वारंवार धीर देत कोरोनाशी लढण्याचे मानसिक बळ दिले आहे. कोणत्याही भूलथापा न मारता कोरोनाच्या काळात वास्तवात जगण्याचे सामर्थ्य उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेस दिले आहे. कोरोनाचे संकट कमी होत असतानाच १९/२० जुलै पासून महाराष्ट्रात आणि मुख्यतः कोकणात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीत चिपळूण शहर दोन दिवस पाण्याखाली गेले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यात बुडाली, महाड जवळ तळये गावात दरड कोसळून ३५ घरे गाडली गेली असे आस्मानी संकट कोसळल्यावर स्वतः मुख्यमंत्री चिपळूण आदी ठिकाणी आले, त्यांनी लोकांना धीर देत संपूर्ण नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली, तळये ग्रामस्थांना नवीन घरे बांधून देण्याचे वचन दिले. त्यामुळे लोकांमध्ये मिसळून त्यांना धीर देत समर्थपणे संकटांशी लढण्याचे बळ त्यांनी लोकांना दिले. विरोधकांच्या टीकेला काडीचीही किंमत न देता आपल्या कामावर लक्ष देत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसा असावा याचं जिवंत उदाहरण इतर राजकीय पक्षांना देत आहेत.
महाराष्ट्राला अल्पावधीतच विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे शांत, संयमी,आदर्शवत आणि समर्थ नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या रूपाने लाभले आहे. महाराष्ट्राच्या अशा आदर्श मुख्यमंत्र्यांचा आज ६१ वा वाढदिवस…
*संवाद मिडियाकडून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा