विशेष संपादकीय….
कोकणात पावसाळ्यात पडणारा पाऊस ही नवी गोष्ट नव्हे, अगदी पूर्वीसुद्धा यापेक्षाही कितीतरी जास्त पाऊस पडायचा. मौसमी वारे सह्याद्रीच्या कुशीत विसवून जेव्हा कोकणात पाऊस सुरू व्हायचा तेव्हाच सह्याद्रीचे वारे हिमालयात पोहचायचे आणि संपूर्ण देशात पाऊस सुरू व्हायचा. कित्येक दिवस कोकणात पूर्वी सूर्यदर्शन होत नव्हते, एवढे पावसाचे प्रमाण असायचे. शेती, बागायती सुद्धा कोकणात मोठ्या प्रमाणावर होत्या. बरीचशी जमीन ही ओलिताखाली असायची, पडीक जमीन कोकणात असायची ती केवळ वरकस, खडकाळ, निरुपयोगीच. परंतु आज शेती, गुरे परवडत नाहीत, शेतकऱ्याला कोणी विचारत नाही अशा भावनेने नोकरदारीकडे नव्या पिढीचा ओढा वाढला. मुंबई, पुणे, गोव्यात नोकरी केली की पैसा येतो, लोक मोठा माणूस समजतात अशा अविर्भावात कोकणी माणसांनी शेती सोडून दिली, जमिनी पडीक राहिल्यात आणि चाकरमानी मुंबईत नोकरीसाठी गेले.
शहरातील वाढते शहरीकरण, काँक्रीटची जंगले, सांडपाण्याचा परिसरात वाढता निचरा आणि जमिनीची पाणी शोषून घेण्याची कमी झालेली क्षमता यामुळे पाणी गटारात वाहून पुढे नाल्याला मिळते. वाढत्या पावसामुळे माती, गाळ वाहून नाल्यातून नदीकडे येतो. पडीक जमिनींमुळे शेतीसाठी पाणी वापरात न येता पाण्याचा लोंढा नदीकडे धाव घेतो. पाण्याबरोबर माती देखील वाहून नदीत जाते, नद्यांची पात्रे त्यामुळे मातीने भरली जातात आणि पाण्याचा प्रवाह जो पूर्वी वेगात समुद्राकडे जायचा तो वेग कमी होऊन नद्यांचे पाणी आजूबाजूला वाड्या वस्त्यांमध्ये घुसते. अनेक ठिकाणी शेतात पाणी घुसल्याने शेती, बागायती वाहून जातात. लोकांचे घराचे, शेताचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. परंतु अलीकडे पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला खरोखर निसर्ग जबाबदार आहे का? याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे.
पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने गावागावातील नदी नाल्यांची वाळू काढली जायची. सरकारची रॉयल्टी भरून वाळू विक्री होत असे. परंतु गेली काहीवर्षे वाळू उपशासाठी गावकऱ्यांचा होणारा प्रचंड विरोध, नदीचा काठ तुटतो त्यामुळे बागायतीचे होणारे नुकसान या आणि अशा अनेक कारणांमुळे कित्येक ठिकाणी नदीतील वाळू उपसा केली जात नाही. सरकारने गावकऱ्यांच्या विरोधामुळे वाळू काढण्यावर आणलेली बंदी, न झालेली वाळू उपश्याची टेंडर यामुळे कोकणातील अनेक नद्या ह्या गाळाने भरलेल्या आहेत. पंधरा वीस फूट खोल असणारी नद्यांची पात्रे आज पाच फूट खोलीची सुद्धा राहिलेली नाहीत. त्यामुळे कोकणात कोसळणाऱ्या पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून नेण्याची नद्यांची क्षमता आपोआपच कमी झाली आहे. कोकणातील नद्यांचा गाळ काढणे हा एक पर्याय असू शकतो, तर दुसरा पर्याय म्हणजे पाण्याचे नियोजन. आज पूर आल्यावर पुरात बरंच काही गमावलेले लोक नद्यांचा गाळ काढण्याची मागणी करतात. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका जिल्हाधिकाऱ्यांनी खारेपाटण येथील शुक नदी आणि कुडाळ च्या भंगसाळ नदीचा गाळ काढण्याची परवानगी देऊन गाळ काढला होता. पुढे त्याचे राजकारण होऊन ते अधिकाऱ्यांना भोवलं होतं, परंतु तेव्हापासून काही वर्षे दोन्ही ठिकाणी पुराचा जास्त त्रास झाला नव्हता ही वस्तुस्थिती आहे.
कोकणच्या कॅलिफोर्निया होणार म्हणता म्हणता कोकणचे शहरीकरण जोरात होत आहे. कोकणात उभी राहणारी काँक्रीटची जंगले यामुळे जमिनीतील पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होऊन पाणी वाहून नद्यांकडे जाण्याची प्रक्रिया वाढली आहे. वाढत्या शहरीकरणासाठी होत असलेली वृक्षतोड, जंगलतोड यामुळे तापमान वाढत आहे. लोक नियतीशी खेळू लागल्याने नियती आता लोकांना खेळवत आहे, याला पूर्णतः लोकच जबाबदार आहेत आणि वृक्षतोडीला पाठीशी घालणारे, नदी नाल्यांचा उपसा रोखणारे सरकार जबाबदार आहे. जोपर्यंत कोकणच्या पाठीमागे असणारा पश्चिम घाट आणि दुसरीकडे आवासून असलेला समुद्र सुरक्षित ठेवणार तोपर्यंतच कोकण सुरक्षित राहील अन्यथा दरवर्षी पावसाळ्यात यापुढे असंच संकट येत राहील आणि त्याला केवळ सरकारला दोष देऊन काहीही होणार नाही तर प्रत्येकाने निसर्गाशी खेळताना सर्वप्रथम पुढील धोक्याचा विचार केला पाहिजे. आज बोडके झालेले डोंगर जे आतापर्यंत झाडांच्या मुळांनी घट्ट धरून ठेवले होते ते अचानक पाण्याच्या माऱ्याने कोसळू लागले आहेत, त्यामुळेच माळीण, तळये, गाळेल सारख्या दुर्घटना कोकणात होत आहेत आणि अनेकांचे जीव जात संसार उध्वस्त होताहेत.
आज जागतिक तापमान वाढीचे संकट जगापुढे उभे आहे, त्याला केवळ आपणच नव्हे तर जागतिक विकासाची स्पर्धा जबाबदार आहे. आपण शाश्वत जीवन जगण्यापेक्षा नवीन काहीतरी करायला जातो. रानभाज्या खाण्यापेक्षा खतांवर वाढवलेल्या भाज्या खाऊन अंगावर मास आणून शरीर पोकळ करत आहोत, जे समोर येणाऱ्या रोगांचा सामना करण्यास असमर्थ ठरते आहे. त्याचप्रमाणे वाढत्या विकासाच्या नावावर आधुनिकीकरण नैसर्गिक आपत्ती ओढवून घेत आहे. आज कोकणात झालेल्या महामार्गामुळे शहरांचे, गावांचे दोन भाग झालेत, अनेक नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलले, काही बंद झालेत. महामार्गासाठी भर घालून उंची वाढविण्यात आली त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी वाहून जाण्यापेक्षा अडून राहत आहे. सिंधुदुर्ग जिल्यात जुन्या महामार्गावर नद्यांवरील पूल वगळता कुठेही पाणी तुंबलेलं आठवत नाही. परंतु आज ओरोस, तेर्सेबांबर्डे, पावशी, वागदे, अशा अनेक ठिकाणी महामार्ग पाण्याखाली जातो. याला आता होत असलेला पाऊस दोषी नसून दोषी आहे ती विकासाची अवास्तव संकल्पना. त्यामुळे तुम्ही पाऊस अडवू नका, अडवायचीच असेल तर विकासाची अवास्तव संकल्पना अडवा.