बांदा
मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर मडुरा पुलाचा काही भाग कोसळून धोकादायक बनले आहे.तर सातार्डा येथे जया पारिपत्ये यांच्या घराजवळ असलेले मोरीपूल कोसळण्याच्या स्थितीत आहे.दोन्ही ठिकाणी जिवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.अद्यापपर्यंत या पुलांच्या बांधकामास मंजुरी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे २६ जुलै रोजीच्या बेमुदत उपोषणावर आपण ठाम असल्याचे श्री देवी माऊली मडुरा दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीचे जगन्नाथ पंडित यांनी सांगितले.
मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग थेट गोव्याला जोडला गेल्याने येथून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते. हलकासा पाऊस जरी झाला तरी पावसाचे पाणी पुलावर येते व मडुरा पंचक्रोशीतील गावांचा सातार्डा व गोवा राज्यात जाण्याचा संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या युवकांना भर पावसात पाणी ओसरेपर्यंत रस्त्यावरच थांबावे लागते.