राज्य सरकार आंतरजिल्हा वाहतूक, हॉटेलिंग सुरू करत असताना, सिंधुदुर्ग जिल्हा सरसकट बंद करण्याची मागणी कितपत योग्य?
विशेष संपादकीय :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसताना बंद होत्या. परंतु मुंबई, पुण्यात रुग्ण झपाट्याने वाढू लागल्यावर चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्याची मुभा दिली गेली आणि सिंधुदुर्गात कोरोनाने झपाट्याने आपले हातपाय पसरले. त्यानंतरही जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात लॉक डाऊन सुरू होते. परंतु आर्थिक विस्कटलेली घडी आणि हाताच्या पोटावर जगणाऱ्या लोकांची होणारी ससेहोलपट पाहता सरकारने लॉक डाऊन मध्ये शिथिलता आणत तोंडावर मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, गर्दी न करणे वगैरे अटीशर्थींवर बाजारपेठा खुल्या केल्या. जिल्हा मर्यादित वाहतूक खुली केली.
गणेशोत्सव दरम्यान जिल्ह्यात दाखल झालेल्या पराजिल्ह्यातील लोक व चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यातच राज्य सरकारने पराजिल्ह्याच्या सीमा खुल्या करत पराजिल्ह्यातील एस टी वाहतूक देखील सुरू केली, आणि इ-पास सुविधा देखील बंद करून बरेचसे व्यवहार सुरळीत सुरू केले आहेत. परंतु दरम्यानच्या काळात जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि व्हेंटिलेटरवर बेड अभावी होत असलेले कोरोनाग्रस्तांचे मृत्यू यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कोरोनाने गेलेल्या राजकीय बळींमुळे अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाच्या संकटाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच काही व्यक्तींकडून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा सरसकट लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परंतु खरोखरच सरकार एकीकडे सर्व सेवा सुरू करत असताना १४ दिवस जिल्हा बंद करून जिल्ह्यातील कोरोना संपूर्ण नष्ट होणार आहे का?
गेले पाच महिने कोरोनापासून बचाव कसा करावा, नागरिकांनी कोणकोणती काळजी घ्यावी, सोशल डिस्टनसिंग, मास्क वापर, सॅनिटायझर चा वापर, हात साबणाने धुवणे इत्यादी बाबत सरकार मोबाईल वरून तसेच सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, दूरदर्शन इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. परंतु नागरिकांनी आपली जबाबदारी न ओळखता, जबाबदारीचे भान न ठेवता बेजबाबदारपणे वागल्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव बाजारपेठा बंद ठेऊन आटोक्यात येणार नाही. तर जबाबदार नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी व्यापार बंद ठेऊन व्यापाराच्या जीवावर दोनवेळाच्या अन्नाची सोय करणाऱ्या गरिबांची जाणीव ठेवत आपापल्या वॉर्डात, गावात लोकांना मास्क वापरने,सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, स्वच्छता बाबत जनजागृती करून आपली जबाबदारी चोख पार पाडली तर नक्कीच कोरोनाला आपण हद्दपार करू शकू.
कोरोना कायमचा जाणार आणि त्यानंतर सर्व कामधंदे, उद्योग व्यवसाय सुरू होतील अशी अपेक्षा करणे आता शक्य होणार नाही, त्यापेक्षा कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल हे शिकणे गरजेचे आहे. सावंतवाडी नगरपालिकेने तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लक्षणे नसल्यास घरातच ठेवावा असा विचार सुरू केला असताना, बाजारपेठा बंद केल्यावर १४ दिवसांनी एकही रुग्ण भेटणार नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. जिल्ह्याच्या, राज्याच्या सीमा खुल्या असताना बाहेरून येणारी प्रत्येक व्यक्ती कोरोनामुक्त असेल याचीही खात्री नसेल. त्यामुळे लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नसून कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. लोकप्रतिनिधींनी जिल्हा वा बाजारपेठा बंद करण्याची मागणी करण्यापेक्षा जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करावे, समाजप्रबोधन करावे. लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे बाजारपेठा सरसकट बंद करून प्रश्न सुटणार का? असा सवाल त्रस्त व्यापाऱ्यांकडून उभा केला जात आहे.