ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हाधिकारी, श्रीम.के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे मेलव्दारे विनंती.
वैभववाडी.
अलीकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काहीवेळा संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांचेकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलिन होते.
शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत व पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव इंद्रा मालो (प्र.सु.र.व.का.) यांनी दि.२३ जुलै २०२१ रोजी परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.५६/१८ (र.वका.) नुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या ग्राहकाभिमुख निर्णयाचे स्वागत करीत असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये या महत्त्वपूर्ण सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी विनंती “ग्राहक पंचायत महाराष्ट्र”- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. तसेच या मेलची प्रत मा. राजेंद्र दाभाडे, पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग व मा. प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.सिंधुदुर्ग यांना पाठविण्यात आली आहे.
१) कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयातील दूरध्वनीचा वापर करावा.
२) कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.
३) भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.
४) भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.
५) कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा.
६) भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी /वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.
७) भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.
८) अत्यावशक वैयक्तिक दूरध्वनी, कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.
९) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात, बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवावा.
१०) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात, बैठकीदरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, आवाज उपकरणे (ear piece, ear phone) वापरणे अशा बाबी टाळाव्यात.
११) कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये इ. महत्वाच्या सूचना नमूद करण्यात आलेल्या आहेत.
सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२१०७२३१९२३३८४५०७ असा आहे.
शासकीय कामकाजात भ्रमणध्वनी वापराबाबतच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये व्हावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस. एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी मेलद्वारे केली आहे.