संवाद मीडियाने टाकला होता प्रकाशझोत
सावंतवाडीतील बाहेरचावाडा परिसरात एलसीबी च्या कारवाईत तब्बल ४ किलो गांजा जप्त करण्यात आला असून गांज्याच्या या रॅकेट मध्ये एकूण ४२ जण सामील असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे गांजा प्रकरणी बाहेरचावाडा या एरियातील काही युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. एलसीबी ने गांजा जप्त करून आरोपींवर अंमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
संवाद मीडियाने काही दिवसांपूर्वी बाहेरचावाडा येथील पेट्रोलपंप समोर तेथील काही युवकांमध्ये नशेच्या भरात मारामारी झाली होती, याची दखल घेत पोलिसांनी पेट्रोलपंप समोर लॉकडाऊन च्या काळात दररोज घोळका करणाऱ्या युवकांवर कारवाई करावी, तसेच त्याठिकाणी जमणारे काही युवक गांजा ओढतात असेही सूचित करण्यात आले होते. परंतु त्याचवेळी पोलिसांनी तो विषय गांभीर्याने घेतला नसल्याने त्या युवकांचे फावले आणि गांजा विक्रीला जोर आला. परंतु कुडाळ येथील एलसीबीच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार धाड घालून बाहेरचावाडा येथील युवकांना गांजा सहित ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ ४ किलो गांजा सापडल्याची माहिती समोर आली आहे.
गेली दोन तीन वर्षे सावंतवाडीत गांजा विक्री होत असल्याचे व काही मुले नशेच्या आहारी जात असल्याची ओरड होती. नगरसेविका आनारोजीन लोबो यांनी देखील एका प्रकरणात तसा आरोप केला होता, परंतु स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्षच केला. त्यामुळे असे गैरधंदे करणारे मोकाटपणे धंदे करतात आणि नवी पिढी त्याच्या विळख्यात सापडत आहे.
बाहेरचावाडा येथे गांजा प्रकरणी आरोपी असलेल्या मध्ये सावंतवाडीतील एका पुढाऱ्याचा पुतण्या असल्याची देखील माहिती समोर येत असल्याने अशा गैरधंद्याना राजकीय आश्रय सुद्धा मिळतो की काय हा प्रश्न उभा राहिला आहे.