You are currently viewing गिर्यारोहण साहसी क्रीडाप्रकार व एक सुंदर जीवनशैली आहे.

गिर्यारोहण साहसी क्रीडाप्रकार व एक सुंदर जीवनशैली आहे.

श्री.उमेश झिरपे.

वैभववाडी.

गिर्यारोहण हा छंद नसून साहसी क्रीडाप्रकार आहे. यामध्ये स्पर्धा नाही परंतु नियम आहेत.त्याला वयाची अट नाही. गिर्यारोहण हा एक धाडसी क्रीडाप्रकार व सुंदर जीवनशैली आहे, असे मत श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक तथा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे यांनी ऑनलाईन व्याख्यानात व्यक्त केले.


“माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट” संस्थेच्यावतीने दिनांक २३ जुलै “वनसंवर्धन दिन” व गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर यांच्या अध्यक्षतेखाली गुगल मीट ॲपवर रात्री ठीक आठ वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गिर्यारोहण एक साहसी क्रीडाप्रकार या विषयावर श्री.उमेश झिरपे यांनी मार्गदर्शन केले.
जमीन, हवा व पाणी या तीन ठिकाणी जवळजवळ सहाशे क्रीडाप्रकार केले जातात. पर्वत, डोंगर, दऱ्या खोऱ्यात प्रवास ही गिर्यारोहणाची प्राथमिक पायरी आहे. पर्यटक आणि गिर्यारोहक यामध्ये फरक आहे. गिर्यारोहण हा एक क्रीडाप्रकार असून यामध्ये स्पर्धा नाही परंतु नियम आहेत. याला वयाची अट नाही. शारीरिक आणि मानसिक तयारी महत्त्वाची आहे. गिर्यारोहण छंद नसून धाडसी क्रीडाप्रकार आहे.


मी गिर्यारोहक कसा बनलो याबद्दल माहिती देऊन जीवन प्रवासातील अनेक किस्से सांगितले.
यातून प्रत्येकाला आपल्या क्षमतांची जाणीव होते. नेतृत्वगुण, संघभावना गुणांचा विकास होतो. तसेच आपल्या जीवनशैलीत बदल होतो. गिर्यारोहण हा विषय शालेय पातळीवर अभ्यासक्रमात आला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे विद्यापीठामध्ये यावर्षीपासून गिर्यारोहण हा डिप्लोमा कोर्स सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यामध्ये गिर्यारोहणाला चांगले दिवस असून आपण सर्वांनी आपापल्या पातळीवर गिर्यारोहण केले पाहिजे. गिर्यारोहण हा प्रशिक्षण घेऊनच टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचा साहसी क्रीडा प्रकार असल्याचे श्री.उमेश झिरपे यांनी सांगितले.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या शिखर संस्थेच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण व दुर्गभ्रमंतीचे आयोजन करण्यात येईल. तसेच पर्यावरण व ऐतिहासिक वारश्यांचे संवर्धन करण्यासाठी बांधील असल्याचे अध्यक्षीय भाषणात श्री.प्रकाश भाऊ नारकर यांनी सांगितले. या ऑनलाईन कार्यक्रमाला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गिर्यारोहक, गिरिप्रेमी, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रा.श्री. एस. एन. पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख सदस्य डॉ.गणेश मर्गज यांनी करून दिली तर डॉ.संजीव लिंगवत यांनी सर्वांचे आभार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा