जीवन कितीही पुढारलं तरी निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही
विशेष संपादकीय….
कोकणात गेला पंधरवडा हा पावसाच्या सरींनी अक्षरशः भिजून गेला. आषाढात कोसळणाऱ्या सरी, जुलै महिन्यात वाढणारे पावसाचे प्रमाण हे दरवर्षी अनुभवायला मिळते. २६ जुलैला तुंबलेली मुंबई ही आठवण तर पावसाळा सुरू झाला की येतेच. माळीण दुर्घटना, मुंबईत इमारत पडून गेलेले जीव आदी सर्व घटना पावसाळ्यात अगदी ताज्या होतात आणि जुलै महिना सुरू झाला की अनेकांच्या उरात धडकी भरते. यावर्षीचा जुलै महिना सुद्धा त्याला अपवाद राहिला नाही. गेले पंधरा दिवस पावसाचे प्रमाण वाढलेच होते, परंतु अतिवृष्टी होऊन नुकसान झाल्याच्या बातम्या ऐकू येत नव्हत्या.
कोकणात संततधार सुरू असणाऱ्या पावसाने शेतीची कामे जोरात सुरू होती. परंतु शेतीची कामगिरी फत्ते होते न होते गेले तीन चार दिवस पावसाने कोकणासह मुंबई आणि घाट माथ्यावरील काही भागात थैमान घातले. सह्याद्रीच्या रांगांमध्ये कोसळणाऱ्या ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः संपूर्ण कोकण कधी नव्हे तेवढे जलमय केले. याचा सर्वाधिक फटका बसला तो रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना. कोकणात पाऊस कितीही पडला तरी कोकणी माणसाला फरक पडत नाही. छोटे मोठे पूर दरवर्षीच येतात, त्यांना कोकणी माणूस कधीही घाबरत नाही, किंवा कोणाकडे मदतीची अपेक्षा, याचना करत नाही. परंतु मागच्या २० जुलै पासून झालेल्या ढगफुटीचा मात्र कोकणातील जीवनावर खूपच वाईट परिणाम झाला. चिपळूण येथील सावित्री नदीला आलेला पूर आणि त्यामुळे बुडालेलं संपूर्ण चिपळूण शहर पाहताना मन खिन्न व्हायचं. संपूर्ण बाजारपेठ, घरे पाण्याखाली गेली, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले रुग्ण विजेच्या अभावामुळे आणि इन्व्हर्टर चा बॅकअप संपल्याने मृत्यूशय्येवर गेले. अथक प्रयत्नांनी डॉक्टरांनी रुग्णांचे जीव वाचविले, तर खाण्यासाठी अन्नाची सुद्धा उपेक्षा झाली. एका कुटुंबातील मुलगा शॉक लागून मृत्युमुखी पडला होता, दुसरा जखमी होता परंतु मृत्यू झालेल्या मुलाचे प्रेत घरात भरलेल्या पाण्यामुळे टेरेसवर ठेऊन शोक व्यक्त करण्याशिवाय त्या कुटुंबाकडे पर्याय नव्हता.. खडवली पुलाखालून डोळ्या देखत एक प्रेत वाहून जात असताना देखील कोणीही काहीही करू शकत नव्हतं, असा रौद्रवतार नद्यांनी घेतला होता.
महाड जवळ डोंगर कोसळून एका गावातील सुमारे ३५ घरे कोसळून ढिगाऱ्या खाली गाडली गेली. त्यात ३५ कुटुंबातील जवळपास ८० माणसे ढिगाऱ्याखाली चिरडली गेली. सरकारची मदत देखील गावात पोचणे कठीण असताना गावकऱ्यांनी जवळपास ३०/३५ मृतदेह बाहेर काढले होते. सरकारी अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा अनेकांनी अधोरेखित केला, परंतु काही पक्षांनी तशाही परिस्थितीत राजकारण सुरू केले होते. अनेक गावे कठीण परिस्थितीतून जात असताना मदत करण्यासाठी अनेक लोक तयार असतानाही भरलेल्या पाण्यामुळे मदत गावांमध्ये पोचणे देखील कठीण होऊन बसले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील गड नदीला आलेल्या पुराचा परिणाम म्हणजे वागदे येथील महामार्गावर पाच फुटापेक्षा जास्त पाणी भरले, त्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, नदी काठावरील हायवे लगत असणाऱ्या घरांना त्याचा तडाखा बसला. अनेकांचे सुरक्षा कठडे कोसळले. वागदे येथील वृक्षवल्ली नर्सरीतील झाडे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ओरोस, पावशी तेर्सेबांबर्डे येथेही महामार्गावर पाणी आले. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे, शिवापूर पंचक्रोशी पाण्याखाली गेली. घोडगे वगैरे भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे माणगाव येथील पुलावर पाणी आल्याने पंचक्रोशीचा संपर्कच तुटला. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. तालुक्यातील वालावल, चेंदवन, पावशी, बाव, अशा अनेक गावातील सखल भागात घरे असणाऱ्या वाडीतील ग्रामस्थांना प्रशासनाने रात्रीच्या वेळी पाणी वाढण्याच्या शक्यतेने तात्काळ स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात एनडीआरएफ च्या तुकड्या मदतीसाठी तैनात ठेवल्या आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील बांदा बाजारपेठेत दरवर्षी अतिवृष्टी झाल्यावर पावसाचे पाणी वाढून तेरेखोल नदीला येणाऱ्या पुरात बांदा बाजारपेठेचा आळवाडी परिसर पाण्याखाली जातो. परंतु यावर्षी झालेल्या ढगफुटीत बांदा येथील विठ्ठल मंदिरासह बाजारपेठ पाण्याखाली जात अगदी बांदेश्वर मंदिर परिसरापर्यंत पाणी भरले होते. विहिरींमध्ये पावसाचे गढूळ पाणी भरल्याने पिण्याच्या पाण्याचे देखील हाल झाले. रात्री अचानकपणे आलेल्या पाण्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कित्येकांनी सामान उचलून सुरक्षा स्थळी हलविले, परंतु वाढलेल्या पाण्यामुळे दुकानांमधीत कडधान्य, तांदूळ सारखी धान्यांची पोती पाण्याखाली गेली. गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी सावंतवाडीत झालेल्या ढगफुटीत माडखोल परिसरात रस्त्यावर आठ दहा फूट पाणी भरून वाहने वाहून जात एकाच मृत्यू झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती होत यावेळी देखील माडखोल रस्त्यावर पाच सहा फूट पाणी भरले त्यामुळे माडखोल बाजारपेठ पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. अनेकांचे नुकसान झाले. मात्र जीवितहानी झाली नाही. बांदा गावाजवळ गाळले येथील डोंगराचा खचलेला भाग गोवा येथून येणाऱ्या शॉर्टकट्स मार्गावर पडल्याने नदीचा प्रवाहच बंद होत, रस्त्यावरून जाणारे एक चारचाकी वाहन पाण्यात बुडाले, परंतु त्याच मार्गावरून प्रवास करणारा दुचाकीचालक डोंगराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमध्ये प्रथमच खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नव्यानेच केलेली शेती पाण्याखाली जात वाहून गेल्याने, कुजल्याने शेतीचे खूपच नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून माड फोफळीच्या बागायती देखील जमीनदोस्त झाल्यामुळे न भूतो न भविष्यती असे नुकसान कोकणवासीयांचे झाले आहे. अनेक लोकांनी चिपळूण येथील पूरग्रस्त भागासाठी मदतीचे हात पुढे केले आहेत. परंतु लोकांनी केलेल्या मदतीवर आयुष्यभर खर्चून उभा केलेला, वाहून गेलेला संसार उभा राहील काय? सरकारने देखील पूरग्रस्त भागास भरीव अशी मदत देणे आवश्यक आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळेल परंतु गेलेली माणसे पुन्हा मिळणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीमध्ये एकमेकांना दोष देऊन घाणेरडे राजकारण, स्टंटबाजी करून शासनाला आणि मदत करणाऱ्या टीम ला अडचणीत न आणता सक्षम राजकीय पक्षांनी जनतेच्या भल्यासाठी जास्तीतजास्त मदत कशी करता येईल याचा विचार करावा. गेले चार दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाचा जोर ओसरला, पाणी देखील कमी झाले, परंतु झालेले नुकसान भरून येणे कठीण वाटत आहे. निसर्गाच्या या खेळामुळे पुन्हा एकदा विज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गापुढे कोणाचेच काहीही चालत नाही हे अधोरेखित झाले आहे.