सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे – अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात
सिंधुदुर्गनगरी
भारतीय हवामान खात्यामार्फंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने तिलारी, वाघोटन व कर्ली नदी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात यांनी केले आहे.
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने आज सकाळी 11.00 वाजता तिलारी नदीची तिलारीवाडी येथील पाणी पातळी धोका पातळी 43.30 मीटर पर्यंत पोहोचली आहे. तिलारी धरणातून सद्य:स्थितीत 1140 घ.मी./सेकंद एवढस विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, धरणाच्या खालील बाजूस तिलारी नदी व पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरण साठ्या होणारी वाढ व विसर्ग पाहता आज धोका पातळी(43.60 मीटरच्या पुढे) ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील प्रामुख्याने तिलारीवाडी, कोनाळकट्टा, परमे, देवमळा, धनगरवाडी, वानोसीवाडी, मणेरी, तळेवाडी, दोडामार्ग, घोटगेवाडी, घोटगे, आवाडे, साटेली, भेडशी, खानयाळे, वायंगणतड, बोडदे, भटवाडी, कुडासे, भरपालवाडी, झरेबांबर, आणि सासोली (वाघमळा) गावातील ग्रामस्थ/ शेतकरी यांना सतर्क राहणेविषयी आवाहन करण्यात येत आहे.