आळवाडीत घुसले पाणी; इमारती पाण्याखाली, स्थानिकांची तारांबळ…
बांदा
आज बांदा शहर व परिसराला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली. बांदा आळवाडी येथे तेरेखोल नदीचे पाणी घुसल्याने येथील अनेक इमारती पाण्याखाली गेल्या.अचानक पाणी आल्याने स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. गेल्या ८ दिवसात आळवाडी बाजारपेठ परिसर दुसऱ्यांदा जलमय झाला. शहरातील निमजगा येथील लक्ष्मी-विष्णू या निवासी इमारतीचा तळमजला पाण्याखाली गेला. आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता.
बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली-सावंतटेम्ब येथे पावसाचे पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. शेर्ले येथील जुने कापई पूल आज दिवसभर पाण्याखाली होते. ग्रामीण भागात देखील ओहोळ, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ग्रामीण रस्त्यांवर पाणी आले होते. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.