You are currently viewing जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 59 योजनांच्या सुधारणात्मक पुनःजोडणीस मंजुरी

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 59 योजनांच्या सुधारणात्मक पुनःजोडणीस मंजुरी

‘हर घर नल से जल’ पूर्ततेसाठी योजना गतीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

‘हर घर नल से जल’ प्रमाणे प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी द्वारे दरडोई किमान 55 लीटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याच्या पूर्ततेसाठी पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. आज जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्व्च्छता मिशन समितीच्या झालेल्या सभेत 59 योजनांच्या सुधारणात्मक पुनःजोडणीस मंजुरी देण्यात आली.

            जिल्हाधिकारी दालनात झालेल्या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नितीन उपरेलु, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भू वैज्ञानिक सागर देसाई आदी उपस्थित होते.

            ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्याकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सुरुवातीस सर्वांचे स्वागत करून सविस्तर माहिती दिली. दरडोई प्रतिदिन 44 लीटर पाणी पुरवठा करणे उद्दिष्ट होते. सद्यस्थितीमध्ये 55 लीटर देण्याचे आहे. 2021 – 22 जिल्हा कृती आराखडा अंतर्गत 481 सुधारणात्मक पुनःजोडणी योजना असून त्यापैकी 40 प्रगतीपथावर आहेत. 190 नवीन योजना आहेत, असे सांगून जिल्ह्यातील 15 ते 25 लाख पर्यंतच्या एकूण 57 योजनांच्या 12 कोटी 89 लाख 98 हजार 660 अंदारपत्रकीय रकमेस तसेच 25 ते 5 कोटी पर्यंतच्या जिल्ह्यातील 2 योजनांच्या 96 लाख 4 हजार रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय त्यांनी सभेपुढे ठेवला. त्यास मंजुरी देण्यात आली.

            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, केंद्र शासन पुरस्कृत सुरु असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून पुनःरचना करण्यात आली आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. संबंधित योजनांची कामे गतीने पूर्ण करून उद्दिष्टपूर्ती करावी, असेही त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा