You are currently viewing कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पुन्हा लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही…..

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पुन्हा लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही…..

कल्याण :

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून दिवसभरात ५००हून अधिक रुग्णांची भर पडत आहे. शहरातील ३६ हजार नागरिकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्याची मागणी होत असून तशा अफवांना उत आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुन्हा लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगून दिलासा दिला आहे.
मात्र, दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्रांमधील निर्बंध कायम राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस लॉकडाउन करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. मात्र, लॉकडाउन उघडल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाउन हा पर्याय नसल्याचा मतप्रवाह देखील मोठा आहे.
आता नव्याने लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र, याचवेळी शहरातील नागरिकांच्या संपर्कात येणारे व्यापारी, भाजी विक्रेते, औषध दुकानचालक यांची अँटिजेनटेस्ट केली जाणार असून राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ संकल्पनेतून शहरातील ४ लाख ५० हजार घरांचा सर्व्हे केला जाणार आहे. यामुळे पुढील काळात चाचण्या वाढणार असल्याने साहजिकच रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, खाटांची पुरेशी सुविधा करण्यात आली असून लवकरच रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असा विश्वास आयुक्तांना वाटत आहे. मात्र, ज्या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत ते भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून या भागात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच करोना संसर्ग टाळण्यासाठी या भागात विनाकारण गर्दी करणे टाळावे, सुरक्षित वावराचे नियम पाळावेत, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा