…..योगेशबुवा रामदासी.
रामदास स्वामी साहित्य शोध ही वेबसाईट म्हणजे समर्थभक्त, अभ्यासार्थी व समर्थ वाङमय संशोधकांना माहितीचा रेडीरेकनर असे गौरवोद्गार श्री. समर्थ विद्यापीठाचे कुलसचीव तथा समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात काढले.
“रामदासस्वामी साहित्य शोध” या वेब साईटचे आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर दि.२० जुलै २०२१ रोजी लोकार्पण झाले. यूट्युबच्या माध्यमातून झालेला हा लोकार्पण सोहळा समर्थ संप्रदायातील अनेक मान्यवर, दासबोध अभ्यासार्थी व समर्थ भक्तांनी अनुभवला. या वेब साईटचे लोकार्पण करताना योगेशबुवा म्हणाले की, “नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेल्या या वेब साईटचा अभ्यासार्थींना तसेच साधकांना फारच चांगला उपयोग होईल. आता समर्थांच्या साहित्यातील शब्द शोधण्यासाठी, त्यांचे अर्थ शोधण्यासाठी व त्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांना, लेखकांना व मनन चिंतन करणार्या जिज्ञासूंना फार कष्ट पडणार नाहीत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या वेब साईटचा लाभ घ्यावा.”
ही वेब साईट तयार करण्याची संकल्पना सौ. वृंदा व श्री. आनंद जोगळेकर यांना सुचली. या कार्यात त्यांना दासबोध सखोल अभ्यासाचे संचालक डॉ. विजय लाड, श्रीमत् दासबोध अध्ययनचे अध्यक्ष श्री.सुहास क्षीरसागर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी सहयोग दिला. श्री. सुहास कुलकर्णी यांनी या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक केले. डॉ. विजय लाड यांनी या वेब साईटला शुभेच्छा देऊन त्यामागील संकल्पना मांडली. श्री. आनंद जोगळेकर यांनी वेब साईटचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकासह संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाची सुरूवात श्रीमती कल्पना धर्माधिकारी यांच्या श्लोकाने झाली.कार्यक्रमाची सांगता श्री.ओंकार नेर्लेकर यांनी सुरेल आवाजात गायलेल्या समर्थांच्या ‘कल्याण मागणे रामा’ या प्रार्थनेने झाली. सौ. शुभदा थिटे यांनी या सोहळ्याचे सुरेख सूत्र संचालन केले. श्री. आमोद रिसबूड यांनी सोहळ्याची सर्व तांत्रिक बाजू सांभाळली.