You are currently viewing शुक्रवारपासून १५ दिवस बुलडाणा जिल्ह्यात जनता कर्फ्यु !

शुक्रवारपासून १५ दिवस बुलडाणा जिल्ह्यात जनता कर्फ्यु !

बुलढाणा

कोरोना बाधीतांच्या आकड्याने पाच हजारचा टप्पा पार केला असून संसर्गाची वाढती व्याप्ती पाहता जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शुक्रवारपासून जिल्ह्यात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. अधिकृतस्तरावर लॉकडाऊन घोषित करता येत नसले तरी नागरिकांमध्ये कोरोनासंदर्भाने नसलेली सतर्कता पाहता अनेकांच्या आलेल्या सुचना पाहता १८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत हा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.

राज्यात सांगली, बारातमती, कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीने जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला असून त्याच धर्तीवर बुलडाण्यातही हा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. पुर्वीच्या पद्धतीने हा जनता कर्फ्यु राहणार नसून त्याची कडक व काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. डॉ. संजय गायकवाड आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते.
या जनता कर्फ्युची गंभीरतने अंमलबजावणी करण्यात येणार असून प्रशासकीय पातळीवरही अधिकारी वर्गात योग्य समन्वय ठेवून कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे १५ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येणार असून २६ लाख ६० नागरिकांचे यामध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी १,७१८ पथके नियुक्त करण्यात आली त्यात ५,१५४ सदस्य राहणार आहेत. प्रामुख्याने दुर्धर आजार असलेल्यांची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या आजाराचे कोवीड-१९ मध्ये रुपांतर होणार नाही, याची काळजी यामध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यु व या अभियानाच्या माध्यमातून येत्या दसऱ्याला कोरोनाचे दहन करण्यासाठी जिल्ह्याने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनच त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा