आयसीबीए इंटरनॅशनल ब्रेल चेस असोसिएशन बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र मिलिंद सामंत हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. मिलिंद सामंत यांनी गुजरातमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता ते ऑक्टोबर २०२१ मधे होणाऱ्या सोळाव्या आयसीबीए इंटरनॅशनल ब्रेल चेस असोसिएशन या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा १६ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत होड्स या ग्रीस देशातील शहरात खेळविण्यात येणार आहे.
कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे गावचे सुपुत्र व वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे कोंडवाडी येथे आजोळ असलेले मिलींद सामंत हे फिडे मानांकन प्राप्त झालेले बुद्धिबळपटू आहेत. ते आपल्या कुटुंबासह पुणे येथे स्थायिक झाले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या गावची ओढ कायम ठेवली आहे. त्यांचे आजोळ असलेल्या भोगवे कोंडवाडी येथील त्यांचे मामा हरी सामंत यांच्याकडे गणेश चतुर्थीच्या कालावधीत ते आवर्जून कोकणात येतात. गावामध्ये आल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहतात. मिलींद सामंत यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.