खा.विनायक राऊत,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक,आ. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश
राज्यातील साकव बांधणी कार्यक्रम अंतर्गत साकव बांधणीच्या खर्चाची आर्थिक मर्यादा वाढविण्याची मागणी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. हि मागणी पूर्ण करण्यात आली असून साकव बांधणीच्या खर्चाची ३५ लक्ष असलेली मर्यादा बांधकाम साहित्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन ६० लक्ष इतकी कमाल आर्थिक मर्यादा वाढविण्यात आली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
अनेक गाव वाड्या नदी व ओहोळावरील साकावामुळे जोडल्या जातात मात्र हे साकव बांधकामासाठी असलेली खर्चाची मर्यादा कमी असल्याने छोटे साकव बांधण्यात येत होते. त्यामुळे त्यावरून वाहने ये जा करणे शक्य नव्हते.तसेच साकव बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर वाढले असल्याने अडचणी येत होत्या. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग दौरयावर आले त्यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आ. वैभव नाईक, आ.दीपक केसरकर यांनी साकव बांधणीच्या खर्चाची आर्थिक मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून साकव बांधणीच्या खर्चाची ३५ लक्ष असलेली मर्यादा बांधकाम साहित्याच्या सन २०१९-२० च्या दरानुसार ६० लक्ष इतकी वाढविण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले आहेत.