कणकवलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन झाले विस्कळीत..
कणकवली तालुक्यात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, रविवारी सायंकाळ पासून पावसाने जोर धरला आहे. नॉनस्टॉप सुरू असलेल्या पावसामुळे कणकवली आचरा मार्गावर वरवडे येथे उर्सुला स्कूल जवळ पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आल्याची माहिती कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी दिली. तसेच कणकवली शहरात रामेश्वर प्लाझा बिल्डिंग च्या तळमजल्याला देखील जवळपास गुडघाभर पाणी भरले होते. त्यामुळे रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी आपली वाहने सुरक्षित स्थळी पार्किंग केली. महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे गेले काही वर्षे येथे सातत्याने पाणी भरत असताना देखील महामार्ग चौपदरीकरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर्षीच्या पावसाळ्यात सलग दुसऱ्यांदा या कॉम्प्लेक्सच्या तळमजल्याला पाणी भरले असल्याने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.