१००% गुण मिळवत सृष्टी हांडे ने पटकावला तालुक्यात प्रथम क्रमांक तर पार्थ क्षीरसागर तालुक्यात द्वितीय क्रमांकांचा मानकरी
संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी केले विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन
काल सायंकाळ नंतर एस.एस.सी.परीक्षेचा निकाल शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील सर्वच शाळांमधील परीक्षेस प्रविष्ट झालेले विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वैभववाडी तालुक्यातील निकाल पाहता अर्जुन रावराणे विद्यालयात शिकणारी कु.सृष्टी लक्ष्मण हांडे. या विद्यार्थीनीने एस.एस.सी परिक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवत वैभववाडी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर याच प्रशालेच्या कु.पार्थ सचिन क्षीरसागर याने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
इयत्ता पाचवीत असल्यापासून कु.सृष्टी प्रशालेतील स्पर्धा, परीक्षा, उपक्रम यांत आवर्जून सहभागी व्हायची. सहभागी झालेल्या प्रत्येक परीक्षेत किंवा स्पर्धेत नेहमीच ती यशस्वी होत असे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, वक्तृत्व निबंध,चित्रकला अशा अन्य स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर तीने यशस्वी कामगिरी करत नेहमीच अर्जुन रावराणे विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. शाळेत पाचवी ते दहावी पर्यंतच्या शालेय परीक्षेत देखील तिने आपला पहिला क्रमांक कायम अबाधित ठेवला आहे. अभ्यासाच्या बाबतीत नेहमीच चौकस असणाऱ्या सृष्टीच्या नजरेतून प्रश्नपत्रिकेतील छापील चुक देखील कधी चुकली नाही.
सृष्टी व पार्थ या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या परीक्षेतील यशाबद्दल प्रशालेचे स्थानिक अध्यक्ष तथा संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शालेय जीवनात सृष्टी व पार्थ यांना मुख्याध्यापक नादकर बी.एस, जेष्ठ शिक्षक शिंदे एस.बी, वर्ग शिक्षक चोरगे एम.एस. तसेच विषय शिक्षक पवार पी.बी.,तुळसणकर एस टी, पाटील एस.एस.,केळकर ए.जी., सावंत पी.पी.,भोसले एस.व्ही., बोडेकर जे.एस.,परिट ए.एस.,सबनिस एस.ए. सुर्यवंशी एस.एम.यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल त्यांचे प्रशालेचे शिक्षकवृंद तसेच कर्मचारी वर्ग यांसह संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन होत आहे. या निकालाबाबत पालकवर्गाकडून देखील समान व्यक्त होत आहे.