एकेरी वाहतूक सुरु;बांधकाम विभागाचे कर्मचारी दाखल
वैभववाडी
तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शनिवारी पहाटे जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून १ कि. मी. अंतरावर दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शनिवारी पहाटे तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली. करुळ घाटमार्ग दुरूस्तीसाठी बंद करण्यात आल्यामुळे बहुतांशी वाहतूक भुईबावडा घाटमार्गातून सुरू आहे. या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच भुईबावडा घाटातून वाहतूक वाढल्याने रिंगेवाडीपासून ३ ते ४ कि. मी. अंतरावर रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे रस्ता अधिकच खचत चालला आहे. याठिकाणी वेळीच उपाययोजना करावी अन्यथा दुर्घटना घडू शकते. अशी भीती वाहनचालकांमधून व्यक्त केली जात आहे.