कासार्डे :
मागील अनेक वर्षापासून बरीचशी शिक्षक पदे संचमान्यतेत नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अ.नगरचे राज्य कोअर कमिटी सदस्य बी.डी. जाधव व पी. डी. वाघमारे यांच्या समवेत नांदेड येथे जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेप्रसंगी आश्वासन दिले .
अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, कोअर कमिटीचे राज्य सदस्य तथा जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण, युवा राज्य सचिव दिनेश म्हाडगुत यांनी दिली.
या वेळी सोशल डिस्टंशींगचे पालन करत निवेदन देण्यात आले.संच मान्यतेत 2014-15 सालापासून शारीरिक शिक्षका बरोबर दोन भाषा शिक्षक , एक गणित-विज्ञान शिक्षक, कला व कार्यानुभव शिक्षक दाखविले जात नव्हते . या नवीन निकषाने मात्र ते संचमान्यतेत घेतले जाणार असल्याने शा. शि. व क्रीडा शिक्षक महासंघ अ.नगर, समन्वय समिती व अमरावती महामंडळाचे वतीने मंत्री महोदयांचे जाधव बी.डी. यांनी अभिनंदन केले. संचमान्यतेतील नवीन निकषात मात्र शारीरिक शिक्षक पद हे आठवे दाखविले जाणार असल्याने मराठवाडयासह दुर्गम भागात कमी पटसंख्येच्या शाळेवर हे पद अस्तीत्वात राहणार नसल्याने भविष्यात अशा शाळेत शारीरिक शिक्षक भरती होणार नसल्याचे मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. 14 मे 1987 च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा तेथे किमान एक शारीरिक शिक्षक असावा तसेच त्याची पदभरती करताना बायफोकल पद्धतीने करण्या संदर्भात, तसेच फीट इंडीया मुव्हमेंट राबविण्यासाठी शिक्षकाला आधीच शाळे वेळेव्यतीरीक्त वेळ द्यावा लागत असून फीट इंडीया अंतर्गत विविध चाचण्या घेण्यासाठी व त्याचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम वाढणार असल्याने अतिरीक्त शारीरिक शिक्षकाची गरज भासणार आहे. त्यामुळे दुसऱ्या शारीरिक शिक्षकाचे संचमान्यतेत 15 वे पद हे निर्धारीत करावे, पवित्र पोर्टलमधील पूर्ण कार्यभाराची अट काढून बायफोकल पद्धतीने नव्याने शारीरिक शिक्षक पदभरती करण्यात यावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिकपासून शारीरिक शिक्षकाची केंद्राला शिफारस करावी या व इतर मागण्यासंदर्भात श्री जाधव यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले. शिक्षणमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेऊन संचमान्यते बाबत आश्वासक पाऊल उचलण्या बाबत उत्कृष्ट प्रतिसाद दिला .