ढिसाळपणा पुन्हा एकदा सिद्ध; पुलावरील वाहतूक रोखली
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचे उड्डाणपूल समजले जाणाऱ्या कणकवली येथील उड्डाणपूलावरील एस.एम.हायस्कुल समोरील एका साईडच्या गोव्याकडे जाणारा लेनचा काही भाग खचल्याने पुलाच्या कामाबाबतचा ढिसाळपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला असून सदरचा भाग सिमेंट काँक्रीटीच्या सहाय्याने मल्लमपट्टी लावून झाकण्याचा प्रयत्न महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराच्या माध्यमातुन सुरू असून हा पूल वाहतुकीस धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सदर पुलावरून वाहतूक बंद ठेवावी. जो पर्यंत पुलाचे व रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होत नाही. तो पर्यंत पुलावरील वाहतूक बंद ठेवावी,अशी मागणी आम्ही कणकवलीकरांच्या वतीने बाळू मेस्त्री व संजय मालंडकर यांच्यावतीने महामार्ग प्राधिकरनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती श्री.मेस्त्री यांनी दिली.
गतवर्षी 13 जुलै रोजी एस एम हायस्कुल समोरच महामार्गाच्या बॉक्सवेलचा काही भाग कोसळला होता. तर त्यानंतर काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुलाची साईट पट्टीसह सल्यबचा भाग कोसळला होता.त्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी या कामाबाबत संताप व्यक्त करताना पुलाच्या कामाबाबतच सवंशय व्यक्त केला होता दरम्यान कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष शिवसेना नेते संदेश पारकर यांनी वागदे गडनदी पुलानजीक महामार्ग रोखत जो पर्यंत पुलाचे आणि सर्व्हिस रोड व अन्य कामे पूर्ण होत नाहीत तो पर्यंत पुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतला होता. परंतु पारकर यांच्या पवित्र्यांनंतर ही वाहतूक सुरूच होती.
त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांना ठेकेदार व महामार्ग प्राधिकरण जुमानत नसल्याचे दिसून आले. आता पुन्हा एकदा उड्डाणपूलाची गोव्याच्या दिशेने जाणारी लेन निकृष्ट ठरली असून रस्त्याचा भाग खचल्याने या पुलाचा दर्जा कसा टिकणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात असून पुन्हा एकदा चिखल फेक सारखा प्रकार घडू नये. वेळीच हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे आणि हा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत व्हावा अशी मागणी वाहतूक चालकांमधून होत आहे.