“मनाच्या सुन्दर व सक्षमतेच्या प्रगटीकरणाचे माध्यम म्हणजे कौशल्य. कौशल्ययुक्त शिक्षण माणसाला आत्मनिर्भर बनविते. युवा पिढीने पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असताना कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण घ्यावे. त्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभ घेऊन सक्षम व्हावे,” असे प्रतिपादन उमेश गाळवणकर यांनी केले. ते जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “सामाजिक गरजांची भूक भागविण्याच्या उद्देशाने आमची शिक्षण संस्था नवनवीन अध्यासक्रम सुरू करीत आहे. पदवी बरोबर कौशल्ययुक्त सर्टिफिकेट कोर्स आजच्या युवा पिढीला स्वयंपूर्ण बनवू शकतात. हे लक्षात घेऊन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. आजच्या तरुण युवा पिढीने या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यास पुढे यावे व स्वावलंबी बनावे. आम्ही मदत करायला नेहमी तयार आहोत”, असे आश्वासनही दिले व दीपप्रज्वलन करून पहिल्या बॅचच्या रजिस्ट्रेशन चा शुभारंभ केला.
कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. कल्पना भंडारी, कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. अरुण मर्गज तसेच बी.एड. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. परेश धावडे, कौशल्य विकास विभागाच्या सौ. वैशाली ओटवणेकर व प्रथमेश हरमलकर, किरण करंदीकर, प्रसाद कानडे इ. उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर शुक्ला यांनी फिजीओथेरपी व नर्सिंग मध्ये कौशल्य विकास अंतर्गत असणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती देऊन पुढील काळात कोणतेही संकट आले. तरी त्याचा मुकाबला करताना आवश्यक कौशल्य असलेले मनुष्यबळ तयार करण्यासाठी बॅ. नाथ पै स्कील डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ने पुढाकार घेतल्याचे सांगून इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन या अभ्यासक्रमाच्या तीस विद्यार्थ्यांच्या एका तुकडीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याचे जाहीर केले. पुढील काळात या इन्स्टिट्यूटचे विधिवत उद्घाटन होणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी या कौशल्य विकास कोर्सचा स्वतःसाठी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे आवाहनही केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी प्रणाली मयेकर यांनी केले.