सत्ताधाऱ्यांमध्ये उद्योग आणण्याची धमक नाही;जी प चे माजी उपाध्यक्ष नाडकर्णी यांचा आरोप
दोडामार्ग
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंनी राज्यात मंत्री असताना लगेच आडाळी एमआयडीसी मंजूर केली. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री सहा वर्षात गंजलेला साधा फलक सुद्धा बदलू शकले नाहीत. उद्योग आणण्याच्या पोकळ बाता मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये उद्योग आणण्याची धमक नाही, असा आरोप माजी जि.प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केला आहे.
याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात श्री.नाडकर्णी यांनी पुढे म्हटले आहे की, आडाळी एमआयडीसी चा प्रस्ताव मी नारायण राणेंसमोर ठेवला. त्यांनी अवघ्या सहा महिन्यात एमआयडीसी मंजूर केली. तत्काळ जमीन हस्तांतरण सुरु केले. अवघ्या एका वर्षात ८०% हुन अधिक जमीन महामंडळकडे हस्तांतरीत झाली. मात्र त्यानंतर राज्यात सत्तान्तर झाले. त्यानंतर शिवसेना मंत्र्याच्या नाकर्तेपणाने तालुक्यातील जनतेचे अतोनात नुकसान झाले. आडाळीत उद्योजक यायला तयार आहेत. पण विकासाच्या बढाया मारणाऱ्या सत्ताधाऱ्याना प्रकल्पाचा विकास करता आला नाही, असे ही नाडकर्णी पुढे म्हणतात. आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना श्री. नाडकर्णी म्हणतात दीपक केसरकर नेहमीच काथ्या उद्योगांचा काथ्या कुटत असतात. मंत्रीपदी असताना चष्मा कारखाना, आयटी प्रकल्प आदी घोषित केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर जणू उद्योगाची उभारणी सुरु असल्याच्या थाटात प्रचार केला. पण गेल्या दोन वर्षात त्यांनी आडाळीकडे ढुंकून पहिले नाही. आता नारायण राणेंना केंद्रात उद्योग खात्याचे मंत्रिपद मिळालं. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री धास्तावले आहेत. अवघ्या सहा महिन्यात ज्या नारायण राणें नी प्रकल्प मंजूर केला, आत्ता तेच आडाळीत उद्योग आणतील. जनतेच्या हिताच काम फक्त राणेच करू शकतात. त्यांच्या मंत्रिपदमुळं शिवसेना नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. जनहिताचा विचार करून गेल्या सहा वर्षात आडाळी कडे लक्ष दिला असता तर आज आडाळीत उद्योग आले असते. शेवटी येथे उद्योग येण्यासाठी ‘ आयुष ‘ मंत्रालयाचा प्रकल्प केंद्राने आडाळीत दिला.
या प्रकल्पसाठी राज्य शासनाने आडाळीत जमीन दिली त्याबद्दल शासनाचे आभार मानतो. शिवसेना मंत्री आणि नेत्यानो विकासाच्या पोकळ गप्पा आता तरी पुरे करा. राणे साहेबांशी विकासाची स्पर्धा करा. म्हणजे जनतेला निदान रोजगार तरी मिळेल, असे आव्हानही यावेळी श्री. नाडकर्णी यांनी दिले आहे.शिवसेनेच्या नेत्यांनी राजकारण म्हणून आडाळी एमआयडीसी कडे पाहू नये. येथील जमीनमालकांनी प्रकल्पाला प्रामाणिकपणे सहकार्य केलंय. त्यांच्या त्यागाचा अपमान करू नका. पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेऊन प्रकल्पला विकसित करा, असेही श्री. नाडकर्णी यांनी पुढे म्हटले आहे.