१८ सप्टेंबर रोजी पत्रकार रस्त्यावर उतरणार, आरोग्य मंत्र्यांना हजारो SMS पाठविणार
मुंबई :
महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोना बळी पत्रकारांच्या कुटुंबियांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना सुरू केली गेली.. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील पत्रकार आरोग्य मंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपला संताप व्यक्त करणार आहेत .. मराठी पत्रकार परिषदेने या आंदोलनाची हाक दिली असून पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अन्य काही संघटना या आंदोलनात सहभागी होत असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे..
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना “कोरोना योद्धे” असलेल्या पत्रकाराचं कोरोनानं निधन झालं तर त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती.. मात्र राज्यात आतापर्यंत २५ पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले असले तरी एकाही पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची काय दमडीची ही मदत सरकारकडून मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी पुढील कॅबिनेटमध्ये पत्रकारांना विमा कवच देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली होती.. मात्र त्याबाबतही कोणताच निर्णय सरकारने घेतला नसल्याने राज्यातील पत्रकार मोठ्या अडचणीत आहेत.. कोविड सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नाहीत आणि खासगी रूग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत अशा कात्रीत पत्रकार सापडले आहेत.
राज्यातील काही पत्रकारांना योग्य उपचार मिळाले नसल्याने त्यांचे मृत्यू झाले आहेत.. टीव्ही 9 चे पांडुरंग रायकर आणि माथेरानचे संतोष पवार ही त्याची उदाहरणे आहेत.. . रायकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.. मात्र घटना घडून पंधरा दिवस झाले तरी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस जबाबदार कोण आहे? ते समोर आलेले नाही.. या सर्व घटनांमुळे पत्रकारांना सरकारने आणि मालकांनी वारयावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.. परिणामत: पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी राज्याच्या कारभार्यांना एमएमएस पाठवून आपला व्यवस्थेबद्दल रोष व्यक्त केला जाईल.. त्याच बरोबर राज्यातील प्रत्येक तालुका तहसिलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळे मास्क लावून निदर्शने करण्यात येतील आणि तहसिलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदनं देण्यात येतील.
कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना तातडीने लागू करावी, पत्रकारांसाठी प्रत्येक रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटीलेटरसह त्वरीत बेड उपलब्ध करावा आणि पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचे अहवाल जाहीर करून जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात येणार आहेत.
एकीकडे कोरोना यौध्दे म्हणून माध्यमांना गोंजरायचे आणि दुसरीकडे त्यांना वाऱ्यावर सोडायचे असे केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण आहे.. या धोरणाच्या विरोधात आणि पत्रकारांच्या हक्कासाठी आरोग्य मंत्र्यांना जास्तीत जास्त एसएमएस पाठवून पत्रकारांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य सोशल मिडिया प्रमुख बापुसाहेब गोरे, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन, आदिंनी केले आहे..