You are currently viewing मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ‘मत्स्य सेतू’ ॲप सुरु

मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ‘मत्स्य सेतू’ ॲप सुरु

सिंधूदुर्ग जिल्ह्यात मत्त्तसंपदा योजना प्रभावी होण्यासाठी युवावर्गाला ऑनलाईन कोर्सचा लाभ मिळणार

भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांची माहिती

मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे “मत्स्य सेतू” हे अभिनव अ‌ॅप “केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते नुकतेच सुरू झाले आहे.मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध ऑनलाइन अभ्यासक्रम असणारे हे “मत्स्य सेतू मोबाईल अ‌ॅप” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव-उद्योजकांसाठी वरदान ठरणार आहे.

आयसीएआर, सीआयएफए (ICAR-CIFA) भुवनेश्वर या सारख्या गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाद्वारे उपजीविकेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधन संस्था आणि राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड (NFDB) हैदराबाद यांच्याकडून हे अ‌ॅप विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून ऑनलाईन कोर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मत्स्य उत्पादक शेतकर्‍यांची क्षमता वाढविणे हा देशातील तंत्रज्ञानाद्वारे अग्रगण्य मत्स्यपालन विकासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मत्स्य शेतीत नवे प्रयोग करणाऱ्या युवावर्गाला योग्य प्रशिक्षण घेण्यासाठी हालचाल करणे अवघड झाले होते. हे नवे मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत करण्यासाठी संशोधन संस्थांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. या परिस्थितीचा विचार करून मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राचं पुढचं पाऊल म्हणून ऑनलाईन कोर्सेस सुरू केले आहेत. अद्ययावत प्रशिक्षणासाठी मत्स्य सेतू अ‌ॅप तयार करणे ही काळाची गरज बनली होती. त्यानुसार बनवलेले हे मत्स्य सेतू अ‌ॅप निश्चितच तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्यास आणि त्यांच्या सोयीनुसार व्यवस्थापनाची योग्य पद्धत राबवण्यासाठी मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मदत करेल. ऑनलाईन कोर्स सुरु करण्यामागील प्रमुख उद्दिष्ट हे देशातील मत्स्यपालक शेतकर्‍यांना गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाच्या तंत्रज्ञाना विषयी माहिती देणे आणि त्याचा प्रसार करणे हा आहे.

शेतकऱ्यांसाठी मत्स्य पालनाचे माशांच्या प्रजातीनिहाय व विषयनिहाय स्वयं-अध्ययन ऑनलाइन कोर्स यामध्ये आहेत. मत्स्यपालन तज्ज्ञ, कार्प, कॅटफिश , स्कॅम्पी यासारख्या व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या माशांची पैदास, बियाणे उत्पादन आणि वाढ यावर मूलभूत संकल्पना आणि व्यावहारिक प्रात्यक्षिके दिली जातात. मरळ , शोभेचे मासे , मोत्याची शेती यात माती परीक्षण, पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी, माती आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींचे पालन करण्यासाठी, जलचर क्षेत्रात अन्न आणि आरोग्य व्यवस्थापन हे विषय देखील या कोर्सेसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

परिपूर्ण विषयानुरूप शिक्षण सामग्रीसह प्रशिक्षणार्थीच्या सोयीसाठी विभागांना लहान लहान व्हिडिओ मध्ये विभागले गेले आहे. स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी चाचणी पर्याय देखील अ‌ॅपमध्ये उपलब्ध केले गेले आहेत. शेतकऱ्यांना मत्स्य सेतू अ‌ॅपवरील प्रत्येक अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण झाल्यावर ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. मत्स्य सेतू अ‌ॅप लाँचद्वारे शेतकरी आपली शंका देखील उपस्थित करू शकतात आणि तज्ञांकडून विशिष्ट सल्ला मिळवू शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य क्षेत्रात वीस हजार कोटीहुन अधिक रुपयांची तरतूद असणारी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएसवाय) ही योजना सुरू केली आहे. कमळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने ही योजना यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. संस्थेच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील काही उद्योजकांनी याचा लाभ घेतला असून त्यांचे प्रकल्पही सुरू झाले आहेत. देशपातळीवर या योजनेअंतर्गत ७० लाख टन मासे उत्पादन टन करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. मत्स्य व्यवसायात येत्या पाच वर्षात ५५ लाख रोजगार उपलब्ध करुन देण्याचा केंद्रसरकारचा विचार आहे. नुकतेच कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे यांच्याकडे नुकतेच मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराचे नवे दालन निश्चितपणे उघडेल, अशी माहिती भाजपा सोशल मीडियाचे श्री. अविनाश पराडकर यांनी दिली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा