बांदा
गेले वर्षभरापासून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा हेतूने अनेक व्यक्ती, संस्था, मंडळ यांच्या वतीने जिल्हा व राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धात्मक उपक्रम राबविले जात आहेत या उपक्रमात जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१शाळेचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होऊन जिल्हा व राज्यस्तरावर सुयश मिळवून शाळेचे नाव उंचावत आहे.
नुकत्याच विविध संस्था व मंडळाने जाहीर केलेल्या निकालात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन यांच्या वतीने बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी इयत्तेतील सानवी शैलेश महाजन या विद्यार्थिनीने लहान गटात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर विद्यार्थी हिताय, राज्यस्तरीय समूह, बालसंस्कार संस्था आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत इयत्ता तिसरीतील नील नितिन बांदेकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेत राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय बाल गवळण गायन स्पर्धेत इयत्ता सहावीतील लौकीक महादेव तळवडेकर याने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत बांदा शाळेचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात सहभागी होणार्या सर्व विद्यार्थ्यांना या संस्था विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करत असतात यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.
बांदा शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सरोज नाईक ,उपशिक्षक जे.डी .पाटील, रंगनाथ परब, उर्मिला मौर्ये, रसिका मालवणकर,शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील,रूईजा गोन्सलवीस, शितल गवस, प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर सरपंच अक्रम खान ,केंद्रप्रमुख संदीप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके पालक व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.