You are currently viewing पंचायत समिती मासिक सभेत सा. बां. चे अधिकारी टार्गेट : उपसभापती अरविंद रावराणे आक्रमक

पंचायत समिती मासिक सभेत सा. बां. चे अधिकारी टार्गेट : उपसभापती अरविंद रावराणे आक्रमक

कनिष्ठ अभियंत्यांना पुढील सभेत न बसण्याची दिली तंबी

वैभववाडी
सार्वजनिक बांधकामचे अधिकारी मासिक सभेत वारंवार दांडी मारत आहेत. त्यांची ही कार्यपद्धत अशोभनीय आहे. तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. या परिस्थितीला अधिकारी जबाबदार आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना पुढे करून ते मासिक सभा टाळत आहेत. प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर पुढील बैठकीत कनिष्ठ अभियंत्यांनी येऊ नये. अशी तंबी उपसभापती अरविंद रावराणे यांनी मासिक सभेत दिली. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन ठराव अरविंद रावराणे यांनी मांडला. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, जि.प. बांधकाम अधिकारी श्री सुतार व खातेप्रमुख उपस्थित होते.

लोरे नं. 2 ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक पाचकुडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. तराळे – गगनबावडा या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सदर खड्डे एजन्सीमार्फत लवकरच डागडुजी केली जाईल तसेच रस्त्याकडील झाडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ती तोडली जातील असे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग शाखा अभियंता डी.जे. कुमावत यांनी सांगितले. फोंडा – उंबर्डे व खारेपाटण – गगणबावडा हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दुरुस्तीबाबत वारंवार सुचना केली जात आहे. परंतु चांगली भाषा अधिकाऱ्यांना समजेनाशी झाली आहे. त्यांना आमदारांचीच भाषा समजत असेल तर त्याचेही नियोजन करु. असे श्री रावराणे यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी एजन्सीना काम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत असे उत्तर दिले. काम घेणाऱ्या सर्व ठेकेदारांना पुढील मासिक सभेत बसण्याची व्यवस्था करा अशा सूचना अरविंद रावराणे यांनी दिल्या.

कोवीड केअर सेंटर मध्ये मनमानी कारभार सुरू आहे. काही रुग्ण सेंटरमधून पळून जात आहेत. हे खपवून घेणार नाही. जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मंगेश लोके यांनी केली. कोवीड केअर सेंटरला शासनाकडून पैसे आले किती? आणि खर्च झाले किती? याचा ताळेबंद सभेत ठेवावा अशा सूचना अरविंद रावराणे यांनी मांडल्या. कोवीड केअर सेंटर मध्ये कार्यरत असणारे डॉ. राजेंद्र पाताडे व कर्मचारी रुग्णांना चांगली सेवा देत आहेत. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात यावा असे अरविंद रावराणे यांनी सुचविले. गावागावात रॅपिड टेस्ट करण्याची स्पर्धा लागली आहे. हा नेमका प्रकार काय? त्याच बरोबर नगरपंचायत चे कर्मचारी टेस्ट करण्यासाठी शहरात आलेल्या नागरिकांची धरपकड करत आहेत. हा प्रकार त्वरित थांबवावा. तसेच काही आरोग्य कर्मचारी प्रशासनाकडून टेस्टचे टार्गेट दिले आहे असे गावागावात सांगत आहेत. तर कृपया टार्गेट हा शब्द बदलण्यात यावा असे सदस्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा