वेंगुर्ला
महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, त्यातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सिंधुस्वाध्याय’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई विद्यापीठाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरू केला. याचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे होणार आहे.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्या समवेत न. प. च्या कॅम्प येथील जागेसंदर्भात तसेच याठिकाणी इमारती पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात काही कालाववधीसाठी नगरपालिकेचे पर्यटन सुविधा केंद्र (निसर्ग रिसॉर्ट) उपयोगात आणण्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आज भेट घेतली.प्रत्यक्ष जागेवर जाऊन या दोन्ही गोष्टींचा त्यांनी आढावाही घेतला.
त्यावेळी नगराध्यक्ष गिरप यांनी त्यांचे नगरपरिषदेत स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, जे जे स्कुल ऑफ आर्ट चे सुनील नांदोस्कर, युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य गणेश, नगरसेवक प्रशांत आपटे आदी उपस्थित होते. यानंतर कुलगुरू यांनी नगरपरिषदेच्या कलादलनाला भेट देऊन या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले व ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य वेंगुर्ला न. प. करत असून पर्यटन वाढीसाठी असे दालन इतर नगरपालिकांनी राबवावे असे उद्गार त्यांनी काढले.
दरम्यान, याबाबत विचार विनिमय करण्यासाठी यांच्या उद्या ७ जुलै रोजी कुलगुरू डॉ. पेडणेकर, आ. दीपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्यासोबत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.