राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर
कणकवली
वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून महागाई दर नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुका राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महागाई कमी करा अन्यथा जनतेसाठी आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्यानंतर आता डिझेल दरही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम हा महागाईवर होत असून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर परवडेनासे झाले आहे. यातच घरगुती सिलेंडर गॅस च्या दरवाढीने सर्वसामान्य जनतेच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. गगनाला भिडलेल्या सिलेंडर गॅस च्या दराने आम जनतेचे बजेटच कोसळले आहे. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारने इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवणे आवश्यक होते. मात्र 7 वर्षांपूर्वी चे आम जनतेला परवडणारे इंधन दर आणि भाजपच्या मोदी सरकार काळातील सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरील वाढलेले इंधन दर यामुळे जनता त्रस्त झाली आहे. या वाढत्या महागाईविरोधात कणकवली राष्ट्रवादी च्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
अन्यथा आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
खाजगी कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत आहे. हे प्रकार जिल्ह्यात कणकवली तालुक्यात जास्त होत आहेत असा दावा राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष पिळणकर यांनी तहसीलदारांशी चर्चेदरम्यान केला. कणकवली तालुका कोव्हीड दर नियंत्रण समितीचा खाजगी कोव्हीड केअर सेंटर चालकांवर वचक नसून रुग्णांच्या होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा अनंत पिळणकर यांनी दिला.यावेळी राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, सागर वारंग, देवेंद्र पिळणकर, अशोक पवार, मारुती पवार, चंद्रकांत नाईक, सेनापती सावंत, उत्तम तेली, किरण कदम, अन्वर साठी, सृजल शेलार, विनोद विश्वेकर, बंड्या शेववी, राजेश पाताडे, प्राजक्ता शिंदे आदी उपस्थित होते.