You are currently viewing जिल्हा परिषदेमार्फत डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा परिषदेमार्फत डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा

कुडाळ :

 

कोरोना कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय सेवेतील तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स,नर्सेस, आरोग्य सेविका, आशा सेविका, वाहन चालक, कंपाउंडर व आरोग्य विभागातील सर्वच घटकांनी अविरतपणे सेवा बजावली. स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता डॉक्टर्स डे चे औचित्य साधून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने आरोग्य सेवेतील सर्वच घटकांचा सन्मान करण्यात आला. पिंगुळी येथील एकांत रिसॉर्टमध्ये पार पडलेल्या कृतज्ञता सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत, महिला व बालकल्याण सभापती सौ.शर्वानी गावकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्री.रणजीत देसाई, कुडाळ तालुका सभापती सौ. नुतन आईर, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, डॉ. प्रसाद देवधर,  सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही डॉक्टर्स, वाहन चालक, नर्सेस, आरोग्य सेविका, आशा सेविका यांनी गेल्या दीड वर्षात आपल्याला आलेले चांगले व वाईट अनुभव कथन केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी कायम पाठीशी राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

 

यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.सावंत यांनी कोरोना कालावधीमध्ये जिल्हा परिषद ने काय केले असे विचारणा-यांचा खरपूस समाचार घेतला. संपूर्ण राज्याला आदर्शवत असे काम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने केले आहे आणि त्याचा सर्व जिल्हावासीयांना अभिमान आहे असे देखील त्या म्हणाल्या.

माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी यावर्षी सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम यापुढे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात साजरा करावा अशी सूचना केली. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी शर्वाणी गावकर, विजय चव्हाण, डॉ. प्रसाद देवधर, नूतन आईर, डॉ. संदेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वच सत्कारमूर्तीना सुपारी चे रोप व गौरवचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनीच जिल्हा परिषदेने आपल्या कार्याची दखल घेऊन गौरव केल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच यापुढे देखील अशाच प्रकारची सेवा बजावण्याचे विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश तेंडोलकर यांनी केले. त्यावेळी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.चुबे, डॉ. जी. टी. राणे, बॅरिस्टर नाथ पै कोविड सेंटर चे डॉ. शुक्ला, ओटवणेकर मॅडम, रूपेश कानडे, सुनील बांदेकर, नागेश आईर, पप्प्या तवटे, राजन पांचाळ, चंदन कांबळी व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा