चांगल्या सोयी सुविधांबद्दल रुग्णांनी मानले आभार
मालवण ग्रामीण रुग्णालया शेजारी असलेल्या कोविड सेंटरमध्ये (डीसीएचसी) आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कोविड रुग्णांची विचारपूस केली.रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या औषध पुरवठ्याबाबत आढावा घेतला.ओरोस जिल्हा रुग्णालयाशी आ. वैभव नाईक यांनी फोनद्वारे संपर्क करून कोविड सेंटरच्या मागणीनुसार तात्काळ औषध पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण ग्रामीण रुग्णालया शेजारी असलेल्या इमारतीत २० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात आले आहे.येथे ५० ऑक्सिजन सिलेंडर व १० कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. मालवण मधील कॊविड रुग्णांना या कोविड सेंटरचा लाभ होत आहे. अनेक रुग्ण याठिकाणी उपचार घेऊन बरे झाले आहेत.
आमदार वैभव नाईक यांनी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. रुग्णांना जेवण पाणी, स्वच्छता, तसेच इतर आवश्यक सोयी सुविधांचा वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्याकडून त्यांनी आढावा घेतला. आ. वैभव नाईक यांनी रुग्णांशी संपर्क साधला तेव्हा या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्यावर चांगले उपचार सुरु आहेत.डॉक्टर नर्स आपली चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहेत. हे कोविड सेंटर मालवण मधील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.कोविड सेंटर सुरु केल्याबद्दल रुग्णांनी आ. वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे यावेळी आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,नगराध्यक्ष महेश कांदळगावकर , नगरसेवक मंदार केणी,उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, पंकज सादये,बाबी जोगी, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, किसन मांजरेकर, प्रसाद आडवणकर आदी उपस्थित होते.