You are currently viewing यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअर्स डे उत्साहात साजरा

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअर्स डे उत्साहात साजरा

सावंतवाडी :

येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये आज रोजी इंजिनीअर्स डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात इंजिनिअर्स डे साजरा करण्यात येतो. अखिल मानव जातीचे जीवन कल्याणकारी व सुखमय बनविण्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सर्व अभियंत्यांना मानवंदना देऊन हा दिवस साजरा केला जातो._

कॉलेजचे प्राचार्य गजानन भोसले यांनी डॉ. विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्युबद्वारे करण्यात आले.

सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.प्रसाद सावंत यांनी आपल्या मनोगतात डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट उलगडला. ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रा. मिलिंद देसाई यांनी उत्कृष्ट अभियंता म्हणून करिअर करण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असे आवाहन केले. जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये यांनी कॉलेजमार्फत साजरा केल्या जाणाऱ्या इंजिनिअर्स डे चे हे सलग सहावे वर्ष असून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे इंजिनिअर्स घडविण्यासाठी कॉलेज कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यानंतर डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. कॉलेजच्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर या चारही विभागांतर्फे आजच्या दिवशी क्विझ कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन प्राचार्य भोसले यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हवाबी शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.पार्थ नाईक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा