You are currently viewing कोंडलेला श्वास

कोंडलेला श्वास

जन्मापासूनच जिणे,
माझे वेगळेच थोडे.
कधी सुटे जीवनात,
पडलेले क्लिष्ट कोडे.

बालपणी मर्यादाच,
सर्व पाळल्यात आम्ही.
समाजात मुलांनाच,
सदा दिली सूट तुम्ही.

लग्न होता पत्नी होते,
आई होत वावरते.
सून म्हणुनीया घर,
मीच एक सावरते.

पत्नी असूनही कधी,
मानलीच नाही सखी.
आनंदाचे क्षण कमी,
मन माझे सदा दुःखी.

मनातली घुसमट,
सांगायची तरी कुणा.
ऐकणारे कान तुझे,
बहिरेच झाले म्हणा.

सुख तुला रात्रीतले,
होते धुंद तन तुझे.
दिसतील कधी तुला,
कोंडलेले श्वास माझे.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा