जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे विभाग नियंत्रकांना पत्र
कणकवली
सिंधुदुर्गनगरीसाठी कणकवली आगारातून सकाळी ९ .३० वाजता सुटणाऱ्या बसफेरीमधून मुख्यालयामध्ये शासकीय कर्मचारी कार्यालयामध्ये जातात. शासकीय कर्मचाऱ्यांची सोय व्हावी या उद्देशानेच ही बसफेरी कार्यान्वित आहे. बसफेरी ही लोकल असल्याने सर्व थांब्यावर थांबत ओरोस येथे पोहचते. ही जलद बसफेरी तातडीने करण्यात यावी, असे पत्र जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना दिले आहे.
ओरोस येथील सर्वच शासकीय कार्यालयामध्ये हजेरीसाठी बायोमॅट्रीक प्रणाली केली असल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब होत आहे. त्याचा परिणाम जनतेच्या कामकाजावर होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत ही बसफेरी जलद करण्याची कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सकाळी ९.३० वाजता कणकवली आगारातून सुटणारी कणकवली – सिंधुदुर्गनगरी बसफेरी तातडीने जलद करण्यात यावी, अशी मागणी संजना संदेश सावंत यांनी केली आहे.