ओबीसी आरक्षणासाठी रान उठवणार
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. यामुळे या नाकर्ते सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने दिनांक २६ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. असे भाजपने जाहीर केले आहे.
कोल्हापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, कोल्हापूर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश यादव, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष विद्याताई बनछोडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी ११ वाजता दाभोळकर कॉर्नर येथे “चक्का जाम” आंदोलन करण्यात येणार आहे.
ओ.बी.सी समाजाला हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नसून दिनांक २६ रोजीच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन होत आहे. तरी कोल्हापूरातील सर्व ओ.बी.सी बांधवांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी होणाऱ्या या आंदोलनाला हजर राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.