You are currently viewing रानभाज्या सेवन करून आरोग्‍य सुदृढ बनवा…

रानभाज्या सेवन करून आरोग्‍य सुदृढ बनवा…

कणकवली :

कोरोना किंबहूना अन्य महामारीचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी प्रत्‍येक व्यक्‍ती तंदुरूस्त असला पाहिजे. त्‍यासाठी रानभाज्‍या सेवन करून आरोग्‍य सदृढ बनवा असे आवाहन माजी खासदार, कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे संस्थापक ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले.

कणकवली तालुक्यातील हळवल गावात जलशक्‍ती अभियान अंतर्गत भाजीपाला लागवड याबाबत बचतगटांना सुधीर सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषि प्रतिष्ठानचे सल्लागार भास्कर राणे, सचिव राजेंद्र सावंत (डोंगरे), कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, बाळकृष्ण गावडे, विकास धामापूरकर, विवेक सावंत भोसले, प्रा. चैताली राणे, प्रा. विवेक राणे, मयूर सावंत उपस्थित होते. समाज सेविका अर्चना पटेल, तसेच हळवल गावातील राजेंद्र राणे, अरुण राणे, अनंत राणे, गणेश राणे, संदीप गुरव, रोहित राणे, अक्षय सावंत, मारुती राणे उपस्थित होते.

श्री.सावंत म्‍हणाले, निसर्गत: मिळणारी प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी प्रत्‍येकाने हंगामानुसार मिळणाऱ्या रानभाज्यांचे सेवन रोजच्या आहारामध्ये करायला हवे. त्‍यासाठी स्वत:च्या परसबागेत विविध जातीच्या भाज्‍यांची लागवड नैसर्गिक पद्धतीने करावी. तसेच प्रत्‍येक गावाने रासायनिक खते, कीटकनाशके हद्दपार करून सेंद्रीय खत निर्मितीसाठी प्राधान्य द्यायला हवे.

ते म्‍हणाले, ज्याचे आरोग्य सुदृढ असते त्याचेच जीवन आनंदी होऊ शकते. तसेच कुठल्‍याही महामारीत ती व्यक्‍ती टिकाव धरू शकते. जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला मोठी संधी आहे. तसेच नैसर्गिक शेतीला मोठी मागणीही आहे. याखेरीज कृषि उत्‍पादनांच्या मार्केटिंगसाठी कृषि प्रतिष्ठान मदत करणार आहे. त्‍याअनुषंगाने हळवल गाव कणकवलीच्या जवळ असून या गावाचा समावेश कृषि प्रतिष्ठांनच्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पामध्ये करण्यात येईल. त्यासाठी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन व मुंबईतील चाकरमान्यांना सोबत घेऊन गाव विकास संघ स्थापन करावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यांनी केले. हळवल गावात यापूर्वी ब्लॅक राईस, झिंक राईस सारख्या देशी भात वाणांची व भुईमूगाच्या व भाताच्या सुधारीत जातींची प्रात्यक्षिके घेतली त्याबद्दल माहिती दिली. यावेळी महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित होत्या. उपस्थितांना कृषि विज्ञान केंद्राद्वारे परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी भाजीपाला बियाणे किट व काजू कलमांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. चैताली राणे व सौ. तुलसी पालकर यांनी सहकार्य केले. आभार डॉ. विलास सावंत यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा