वैभववाडी
सध्या कोरोनारुपी महामारीने मानवी जीवनावर आक्रमण केले आहे. परंतु ती महामारी नवीन नसून अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. प्रत्येक काळात तिचे स्वरूप वेगवेगळे होते आणि भविष्यामध्ये राहणार आहे. अशा प्रकारच्या महामारी पासून आपला बचाव करण्यासाठी योग आणि आयुर्वेद पद्धतीचा अंगीकार करावा असे मत डॉ.तुळशीराम रावराणे यांनी व्यक्त केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने २१ जून रोजी सातव्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ च्या निमित्ताने ‘कोरोना महामारी आणि योग आयुर्वेदाचे महत्त्व’ या विषयावर संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजयजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात डॉ. रावराणे बोलत होते.
आयुर्वेद, आयुर्वेद चिकित्सा पद्धती तसेच योग व प्राणायाम याबाबत सविस्तर माहिती दिली. आजच्या काळात कोरोना सारख्या महामारीपासून बचाव होण्यासाठी आणि आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सर्वांनी आयुर्वेद आणि योगाचा अवलंब करावा असे डॉ. रावराणे यांनी आवाहन केले.
आयुर्वेद आणि योग ही भारताने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. आजच्या काळातही सर्वांनी आयुर्वेद व योगाचा अवलंब केल्यास कोरोना सारख्या महामारीपासून बचाव होण्यास मदत होईल असे अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विजय लाड यांनी सांगितले.
या ऑनलाईन व्याख्यानाला राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केले.