You are currently viewing जिल्ह्यात कोरोनाचे संकट, जनता हतबल

जिल्ह्यात कोरोनाचे संकट, जनता हतबल

राजकारण्यांची सवंग लोकप्रियतेसाठी स्टंटबाजी

विशेष संपादकीय…..

शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील एका पेट्रोलपंपवर १०० रुपयात २ लिटर पेट्रोल देण्याची घोषणा केली, परंतु त्यासाठी भाजपचे सदस्यत्व असण्याची अट होती. यात भर म्हणजे जो पेट्रोलपंप मोफत १ लिटर पेट्रोल देण्यासाठी निवडला होता तो देखील नारायण राणे यांच्या मालकीचा त्यामुळे संघर्ष होणार हे अटळ होतं. आज सकाळी पेट्रोलपंप वर ही योजना सुरू केल्यावर भाजपाचे कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक समर्थक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटला.


आमदार वैभव नाईक यांनी एक दिवस अगोदर पोलीस स्टेशनमध्ये योजनेची माहिती दिल्याने त्याठिकाणी संघर्ष होऊ शकतो या शंकेने रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा तांडव पाहता अशा प्रकारचे आंदोलन होत असताना पोलीस प्रशासनाने परवानगी देणे योग्य होते का? दुसरा विषय म्हणजे कोरोनाच्या महामारीत जिल्हा संकटात असताना सवंग लोकप्रियतेसाठी स्टंटबाजी करून राजकीय राडा करणे जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावामध्ये ठीक होते का?


एखादी व्यक्ती पेट्रोल मोफत देते तर ते घेऊनही गप्प बसता आले असते किंवा अशा प्रकारची स्टंटबाजी न करता वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध म्हणून इतर सनदशीर मार्गाने आंदोलन करता आले असते. परंतु राजकीय लोकांच्या अशाप्रकारच्या स्टंटबाजीमुळे पेट्रोलपंप आवारात मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली, त्यात बघ्यांचीही गर्दी वाढलेली होती पोलीस फोर्स, रॅपिड ऍक्शन फोर्स आदींच्या गर्दीमुळे स्टंटबाजीच्या नादात कोरोनाचा मात्र जोरदार प्रसार झाला, कित्येकांच्या तोंडावर मास्क नव्हती, राडेबाजीच्या नादात अनेक जण मास्क काढून घोषणाबाजी करत होते. त्यामुळे जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना राजकीय पक्ष गर्दी करून जनतेला मरण यातना भोगायला लावताहेत असंच दृश्य दिसून आलं होतं.
जिल्ह्यात दररोज ५०० पेक्षा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत, कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय असताना निव्वळ स्टंटबाजी म्हणून राजकीय नेत्यांनी आंदोलने न करता आपली संपूर्ण शक्ती जर जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी खर्ची घातली तर भविष्यात जनतेच्या दारात मतांच्या जोगव्यासाठी फिरण्याची पाळी नेत्यांवर येणार नाही. रस्तावर उतरून राडे करण्यापेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांना मदत केली ते जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या आवाक्यात येईल यात शंकाच नाही. जिल्ह्यात राजकीय संघर्ष उभा करण्याची ही वेळ नव्हे, एकाने दगड मारला तर दुसऱ्याने दगड मारला तरच त्याची हिंमत दिसते असे नव्हे, तर त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याला देखील जनता लक्षात ठेवते. परंतु जर अशावेळी संघर्ष उभा राहिला तर जनता अशा पक्षांना मात्र कायम ध्यानात नव्हे तर डोक्यात ठेवते. जिल्ह्यावर आलेल्या संकटाच्यावेळी आरोप प्रत्यारोप, एकमेकांस धमक्या देणे, आणि प्रक्षोभक विधाने करून कार्यकर्त्यांना राडा करण्यास प्रवृत्त करण्यापेक्षा हतबल असलेल्या जिल्ह्यातील जनतेच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे. राजकीय राडे करून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे परंतु जनतेसाठीच….

प्रतिक्रिया व्यक्त करा