You are currently viewing आम. वैभव नाईक यांनी तारीख आणि वेळ जाहीर करावी…तुम्ही सांगाल त्या मैदानात आम्ही येतो!

आम. वैभव नाईक यांनी तारीख आणि वेळ जाहीर करावी…तुम्ही सांगाल त्या मैदानात आम्ही येतो!

समीर नलावडे व गोट्या सावंत यांचे आम.वैभव नाईक यांना आव्हान

कणकवली

माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांना खुल्या मैदानात येण्याचे आव्हान देणाऱ्या आम.वैभव नाईक यांचे आव्हान मी समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वीकारले आहे. आम. वैभव नाईक यांच्या त्या आव्हानाला निलेश – नितेश राणेंची गरज नाही आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून दोघेजण सक्षम आहोत. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी तारीख आणि वेळ जाहीर करा. तुम्ही सांगाल त्या मैदानात आम्ही येतो असे थेट आव्हान कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार वैभव नाईक यांना दिले आहे.

अडचणीत आल्यावर कार्यकर्त्याला टाकून पळण्याची परंपरा आमदार वैभव नाईक यांनी या अगोदरपासूनच अनेकदा अवलंबली आहे. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर वेंगुर्ल्यातील घटनेवेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची वेंगुर्ल्यात इंट्री झाली हे समजताच वैभव नाईक हे आचरा मार्गे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकून पळून गेले होते. केवळ स्टंट करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यात जर हिंमत असेल व मोफत पेट्रोल द्यायची योजना राबवायची असेल तर त्यांच्या कणकवलीतील पंपावर राबवावी. भाजपाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पेट्रोल भरायला येतो. एवढेच काय संपूर्ण कणकवली तालुका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी घेऊन येतो असे आव्हान श्री नलावडे यांनी दिले आहे.

शांत असलेला सिंधुदुर्ग जिल्हा भडकवण्याचे काम आमदार वैभव नाईक करत असल्याची टीका श्री नलावडे यांनी केली. जनतेचा कळवळा आपल्यालाच असल्याचा स्टंट आमदार वैभव नाईक यांनी करत कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या पंपावर पेट्रोल देण्याचे जाहीर केले. जर जनतेला द्यायचेच असेल तर आमदार नाईक यांनी स्वतःच्या वागदे तील पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल द्यायची हिम्मत ते दाखवतील का? इतर वेळी दहशतवादा च्या नावाने ओरडणाऱ्या वैभव नाईक यांनी शांत असलेल्या कुडाळ मध्ये आपला दहशतवादाचा खरा चेहरा दाखवून दिला. त्यामुळे कुडाळ त्या जनतेने आमदार वैभव नाईक यांचे खरे रूप आता ओळखले आहे.

कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करणे हे सत्ताधारी आमदार म्हणून वैभव नाईक यांचे काम होते. मात्र आमदार वैभव नाईक यांच्या हस्तक्षेपामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप श्री नलावडे यांनी केला. इतर वेळी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम आज केल्याचा आरोप श्री नलावडे यांनी केला. आमदार वैभव नाईक यांचे मुख्यमंत्र्यांशी निकटचे संबंध आहेत असे त्यांचे कार्यकर्ते सर्वांना सांगतात. मग अशी स्टंट बाज आंदोलन करण्यापेक्षा वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून इतर राज्यांप्रमाणे पेट्रोलवरील राज्य सरकारचा कर कमी करावा. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आतापर्यंत सामाजिक कार्यक्रम केले जात होते. मात्र वैभव नाईक यांनी वर्धापनदिनी कुडाळ मध्ये राडा संस्कृती सुरु करून आपले खरे रूप दाखवून दिले अशी टीका श्री नलावडे यांनी केली.

सत्ता ही काही काळापुरतीच असते. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी कुणाचा बाप काढते वेळी विचार करावा. आज तुमची सत्ता आहे, उद्या आम्ही पण सत्तेत असू असा इशारा श्री नलावडे यांनी दिला आहे. आता भाकरी करपली कुडाळ मालवण ची जनता पुढच्या निवडणुकीत ही भाकरी परतुन वैभव नाईक यांना त्यांची जागा दाखवेल असा टोला श्री नलावडे यांनी लगावला. वैभव नाईक यांना हा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. त्यांचे अनेक मुद्दे आमच्या हातात आहेत. त्यामुळे वेळीच गप्प राहा अन्यथा आम्हाला तोंड उघडावे लागले तर पळताभुई थोडी होईल असा इशारा श्री नलावडे यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा