You are currently viewing हिंमत असेल तर निलेश-नितेश या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावे…! – आमदार वैभव नाईक

हिंमत असेल तर निलेश-नितेश या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावे…! – आमदार वैभव नाईक

 

कुडाळच्या रणांगणात कुणी कुणाला प्रसाद दिला, हे नितेश राणेंना मुंबईतल्या ‘अधीश’ बंगल्यात बसुन समजणार नाही. त्यासाठी त्यांनी आज  कुडाळच्या रणांगणात उतरण्याची हिंमत दाखवायला हवी होती. म्हणजे त्यांना सुद्धा शिवप्रसादाची चव चाखायला मिळाली असती. अशा शब्दात राणे बंधूंना आमदार वैभव नाईक यांनी डिवचले आहे. ट्विटरवर बसुन टिव्हटिव्ह करण्याव्यतिरिक्त ते कोणत्याही रस्त्यावरच्या लढाईत उतरू शकत नाहीत, हे एव्हाना त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळून चुकले आहे. त्यांच्यासारखीच गत त्यांचे मोठे बंधु असलेल्या निलेश राणेंची आहे. कोणत्याही आंदोलनात किंवा राड्यात नेतृत्व करायची किंवा हाणामारी करायची वेळ आली की निलेश व नितेश हे दोघेही बंधु पळ काढतात.

राणे बंधु फक्त ट्विटरवर बसुन फुकाच्या वल्गना करू शकतात.  शिवसैनिकांचा खुल्या मैदानात सामना करण्याची या दोघाही भावांची कधीच हिंमत होणार नाही. जेव्हा डंपर आंदोलनावेळी पोलीसांनी चोप देण्यास सुरुवात केली तेव्हा स्टंटबाजी करणारे नितेश राणे कार्यकर्त्यांच्या मागे दडून बसले. त्यांचा त्यावेळचा लपलेला फोटो सोशल मिडियात सर्वत्र वायरल झाला होता. त्याच डंपर आंदोलनात पोलीसांनी जेव्हा शिवसैनिकांवर लाठीमार केला, तेव्हा मी शिवसैनिकांसोबत पोलीसांचा मार खाल्ला परंतु कुठेही लपलो नाही किंवा आंदोलन सोडुन पळालो नाही. २०१३ साली कणकवली शहरात जेव्हा आमनेसामने राडा झाला तेव्हा शिवसैनिकांसोबत मी स्वतःसुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना जाऊन कशा प्रकारे भिडलो हे टेलिव्हिजनवर संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. आमचा इतिहास हा प्रत्यक्ष खुल्या मैदानात जावुन भिडण्याचा आहे तर नितेश राणेंचा राजकीय इतिहास हा पळपुटेपणा करण्याचा आहे. शिवसेनेचा जन्म हाच मुळी आंदोलनातुन झालाय. त्यामुळे शिवसैनिकांना मैदानात उतरून संघर्ष करणे शिकवावे लागत नाही. आज सुद्धा मी माझ्या शिवसैनिकांसोबत राणेंच्या पेट्रोल पंपावर स्वतःच घुसलो आणि मग भाजप कार्यकर्त्यांसोबत आमची बाचाबाची झाली. वाघाला शिकार करण्यासाठी शत्रूचाही इलाका चालतो. त्यामुळे मी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही खुले आव्हान देतो की ट्विटरवर टिव्हटिव्ह करायची सोडुन द्या आणि तुम्ही दोघेही भाऊ एकदा काळ्या गणवेशातील अंगरक्षक बाजुला ठेवुन खुल्या मैदानात उतरायची हिंमत दाखवा…! तुमचा दोघांचाही सामना करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मी एकटाच येईन…!! निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या आवडीचे ठिकाण निवडावे आणि शिवसेनेविरोधात एकदा खुल्या मैदानात उतरून दाखवावे. ऊठसूट शिवसेना पक्षनेतृत्वावर ट्विटरच्या माध्यमातून गरळ ओकणाऱ्या राणे बंधूंना शिवसैनिक खुल्या मैदानात जन्माची अद्दल घडवतील. शिवसैनिक नेमके कशा पद्धतीने प्रसादाचे वाटप करतात त्याची चव दोघाही भावांना निश्चितपणे चाखायला मिळेल. फक्त शिवसैनिकांनी प्रसाद वाटप करायला सुरुवात केली की दोघांनीही पळपुटेपणा करून आडोशाला लपु नका. शेवटपर्यंत मैदानात ठामपणे उभे राहुन बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा प्रतिकार करावा. असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा