वारेमाप बिलांमुळे रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला…
संपादकीय….
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच कोरोनाचा कहर झाला, जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त रुग्णसंख्या वाढल्याने जिल्ह्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारी रुग्णालये आणि कर्मचाऱ्यांवर खूप ताण आला होता. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही डॉक्टर्सनी खाजगी कोविड सेंटर सुरू केले. परंतु जिल्ह्यात कित्येक रुग्ण असे होते जे सरकारी रुग्णालयांच्या नावानेच घाबरून खाजगी रुग्णालयात दाखल होतात, तर काही रुग्ण सरकारी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने कित्येकजण नाविलाजने का होईना आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील खाजगी रुग्णालयात दाखल होतात.
जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयांनी रुग्णांना चांगली सेवा दिली. खाजगी कोविड सेंटरमुळे जिल्ह्यात रुग्णसेवा वाढली, उपचार झाले. परंतु शासनाने खाजगी सेंटरना जे नियम घालून दिले त्या नियमानुसार सेंटर मधून बिले दिली गेली नाहीत. उपचार झाला, आणि रुग्ण बरा झाला तरी रुग्णांना वारेमाप बिल दिले गेले. कित्येकदा एखाद्या रुग्णाची प्रकृती जास्तच बिघडली तर त्याला तात्काळ कोल्हापूर, मुंबई आदी ठिकाणी हलविण्यास सांगितले जात आहे, परंतु अशाही परिस्थितीत रुणांची पर्वा न करता अगोदर बिल भरण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे कित्येक रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.
खाजगी सेंटर मधून डिस्चार्ज दिल्यानंतर किंवा रुग्ण दुसरीकडे पाठविल्यानंतर बिलांची रक्कम स्वीकारतात परंतु त्याचे बिल का दिले जात नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खाजगी कोविड सेंटर मधून सेवा ते मिळतेच परंतु सर्वसामान्य रुग्णांची कोरोनाच्या नावावर लूट होत असल्याचे देखील दिसून येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमधून सुरू असलेला हा प्रकार रोखणार आहेत का? जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी खाजगी रुग्णालयातील हा प्रकार गंभीरपणे घेणार का? असे प्रश्न जिल्हावासीयांना पडू लागले आहेत.