पिवळ्या प्लास्टीक खाली – डी के सावंत
चार दिवसांपूर्वी मी स्वतः फोन करून संबंधित अधिकाऱ्याला सांगितले होते की हे जे बांधकाम आपण करत आहात त्याला पाया नाही परीणामी भर पावसाळ्यात केलेले बांधकाम टिकणार नाही तरी सुद्धा हेकेखोर पणे निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून केलेले बांधकाम केवळ २४ तासात जमिनदोस्त झाले व या सार्वजनिक बांधकाम भ्रष्टाचार विभागाची लक्तरे मळगाव मेटात उघडी पडली. त्यावर पिवळे प्लास्टीक झाकून उरलीसुरली लाज राखण्याचा केविलवाणा प्रयत्न या भ्रष्टाचारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला पहायला मिळतो.
गेल्या पंधरा वर्षांपासून माझा संपर्क या खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी आला. या विभागात किती अधिकारी आपल्या कर्तव्याची प्रामाणिक राहून काम करतात हा संशोधनाचा विषय आहे. आंबोली घाट रस्ता, आंबोली रेस्ट हाऊस, सावंतवाडी- बांदा येथील पोलिस वसाहत, आंबोली पर्यटन प्रकल्प, जिल्हा उप रुग्णालय सावंतवाडी, जिल्ह्यातील रस्ते जे जे या विभागाच्या अखत्यारित येते ते ते भ्रष्ट कारभारामुळेच निकृष्ट दर्जाचे हे सत्य आहे. येथे येणारे अधिकारी आपल्या पुढच्या आयुष्याची तरतूद करण्यासाठीच सावंतवाडी विभागात येतात असे म्हणायला वाव आहे. काही वर्षांपूर्वी नवखणकर नावाचा उप अभियंता तर आपल्या सात पिढ्यांची सोय करून निवृत्त झाले.
सर्व सामान्य नागरिकांना किरकोळ कामासाठी नियम दाखवणारे, वारंवार फेऱ्या मारायला लावणारे हे अधिकारी आर्थिक लाभाचे काम असेल नियम कसे धाब्यावर बसवतात त्याची अनेक उदाहरणे आहेत.