You are currently viewing सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क खात्याचा वरदहस्त

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क खात्याचा वरदहस्त

तरीही पक्या अडकला मुंबई भरारी पथकाच्या जाळ्यात

गोव्यातून दररोज लाखो रुपयांची चोरटी दारू वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेगवेगळ्या मार्गांनी मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक मुंबई, कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी होत असते. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गोव्यातील चोरटी दारू वाहतूक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्र हद्दीत आणि कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये सुरळीत सुरू असते. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे काल मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याने चिपळूण येथील कुंभार्ली घाटात केलेली कारवाई.
गोव्यातून होणारी दारूची अवैध वाहतूक ही जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या डोळ्यात धूळफेक करून होत नसून डोळ्यादेखत खात्याच्या आशीर्वादाने होत असते. गोव्यातून ट्रक मध्ये भरलेली चोरटी दारू वाहतूक करणाऱ्या पक्याची हजारावर बॉक्स भरलेली गाडी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द देखील बरीच पार करून गेलीच कशी? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेच्या गाड्या देखील जिल्ह्यात सर्वत्र तपासल्या जात असताना दारू भरलेली गाडी सहीसलामत जिल्हा पार करते म्हणजे त्यात नक्कीच जिल्ह्यातील राज्य उत्पादन खात्याचे हात ओले झालेले असणार.
मुंबई येथील राज्य उत्पादन खात्याच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ट्रक मधून दारू वाहतूक होत होती, त्यानुसार सापळा रचून चिपळूण जवळच्या कुंभार्ली घाटात सदरचा १३५० बॉक्स दारू भरलेला ट्रक रात्री १.०० वाजण्याच्या सुमारास अडविण्यात आला. त्यातील ड्राइवर जवळ चौकशी केली असता आत दारू असल्याची माहिती मिळाली. या ट्रक च्या पाठोपाठ संशयित वाहतूक करणारे दोन चारचाकी गाड्यातून येत असल्याचे उघड झाल्याने त्या दोन चारचाकी गाड्या देखील पकडल्या गेल्या. एकूण ट्रक सहित दोन चारचाकी गाड्या व दारूचे १३५० बॉक्स मिळून सव्वाकोटींच्या आसपास किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईत दारू वाहतूक प्रकरणी दोघे ड्राइवर, क्लिनर मूळ राजस्थान व मध्यप्रदेश येथील वगळता सावंतवाडी येथील पाच जणांना अटक करण्यात आली. यात मुख्य सुत्रदार म्हणून सावंतवाडीच्या पक्याला व त्याच्या भावासहित आणखी तिघांना अटक करण्यात आली. सावंतवाडीच्या पक्याचे दारूचे धंदे हे जगजाहीर आहेत, खाकी वर्दीला हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक केली जाते. परंतु हात ओले असल्याने खाकीकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही.
मुंबई येथील राज्य उत्पादन खात्याच्या भरारी पथकाने गोव्यातून सिंधुदुर्ग मार्गे मोठ्या प्रमाणावर होणारी चोरटी दारू वाहतूक पकडल्याने व आरोपी गजाआड केल्याने जिल्ह्यातील राज्य उत्पादन खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हा राज्य उत्पादन, कोल्हापूर येथील राज्य उत्पादन खाते काय करते?आणि जिल्ह्यात बसवलेल्या खाकी वर्दीच्या चेकपोष्टवर नक्की काय पाहिले जाते?

प्रतिक्रिया व्यक्त करा