खास.नारायण राणे यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र
सिंधुदुर्गात शासनाच्या अनास्थेमुळे कोरोना महामारीचा हाहाकार उडाला आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे, पायाभूत सुविधांचा अभाव आणि सरकारकडून होणाऱ्या अनास्थेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या लाटेमध्ये भरडून निघाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिव्हिल सर्जनसह आरोग्य सेवेची सर्व रिक्त पदे तातडीने भरा अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
श्री.राणे यांनी निवेदनात म्हटले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील आरोग्य सेवेची लक्तरे उघडयावर आली आहेत. १५ जून अखेरिस जिल्ह्यामध्ये एकूण बाधितांची संख्या ३५२५६ असून सक्रिय रुग्णसंख्या ६६४३ आहे या महामारीने जिल्ह्यामध्ये ८८८ रुग्णांचा बळी घेतला आहे असे शासकीय आकडेवारी सांगते. यातील २०५ मृत्यू मागील १५ दिवसातील आहेत. शासनाची अनास्था अशी की , या जीवघेण्या महामारीमध्ये सिव्हिल सर्जनचेच पद रिक्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी ( गट अ ) च्या मंजूर ७६ पदांपैकी ३९ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची ९७ पदे रिक्त आहेत . कोरोनाची साथ एवढया तीव्रतेने पसरलेली असताना जिल्हा साथ रोग अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे.
जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये राज्य व जिल्हास्तरीय ८७८ पदांपैकी ३१८ पदे रिक्त आहेत. शासनाच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील नागरीक प्रक्षुब्ध झाले आहेत. आरोग्य सेवक नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच रुग्णसेवेसाठी थांबवून ठेवण्याचे प्रकार तर जिल्हाभर सर्वत्र आढळून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयाला या भयंकर संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनसह आरोग्य सेवेची सर्व रिक्त पदे तातडीने भरणे, राज्याच्या कोविड टास्क फोर्सने जिल्ह्याला भेट देणे, मोठया प्रमाणात लसीकरणाची मोहिम राबविणे, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरु करणे आणि सावंतवाडी व कणकवली उप जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध करणे यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी अशीही मागणी नारायण राणे यांनी केली आहे.