आंबोली घाटात आत्महत्येचा केला होता प्रयत्न
मानसिक तणावाखाली असल्याची पोलीसांची माहिती
सावंतवाडी
आंबोली घाटाच्या दरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या नवविवाहितेला बुधवारी गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. शिरोडा येथे शिक्षक असलेल्या पतीसोबत झालेल्या भांडणातून तिने हा प्रकार केला होता. कमल रामनाथ इदे ( २४, रा. आकोले अहमदनगर ) असे तिचे नाव असुन ती मानसिक दडपणाखाली असल्याची माहीती तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली.
कमल हिने आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास दरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, ती त्यात बालंबाल बचावली होती. आंबोली येथील रेक्यु टीमच्या सहाय्याने पोलिसांना तिला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले होते. त्यानंतर तिच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार करुन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.
पोलीसांच्या चौकशीत सुरुवातीला तिने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण सांगण्यास नकार दिला होता. आपली कोणाविरोधात कसलीही तक्रार नसल्याचेही तिने सांगितले होते. मात्र, अधिक तपासादरम्यान पतीसोबत झालेल्या भांडणातून आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट करीत पती व आपण शिरोडा येथे भाड्याने राहत असून पती शिक्षक असल्याची माहिती दिली होती. मंगळवारी सकाळी झालेल्या किरकोळ भांडणातून आपण घरातून बाहेर पडले असे तिने पोलिसांना सांगितले.
मात्र, संबंधित महिला मानसिक दडपणाखाली असल्याने तसेच दरीत उडी घेतल्याने जखमी झाली असल्याने तिला अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्या माहेरच्यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली आहे. मात्र, माहेरच्या लोकांनीही आपली कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार महत्वाचा असल्याने तिला गोवा बांबूळी येथे हलवण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी तौसिफ सय्यद यांनी दिली.