राज्याच्या आरोग्य विभागातील १३ हजार जागांच्या जम्बो भरती मध्ये मराठा समाजाचे उमेदवार ईडब्ल्यूएस मधून अर्ज करू शकणार आहेत. ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या निर्णयानंतर आघाडी सरकारने मराठा समाजाला आरोग्य विभागातील भरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गातील पद खुले केले आहे.
आरक्षण रद्द झाल्यामुळे शिक्षणात आणि नोकरीत तरुणांना संधी नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांचे मनोमिलन झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला चांगलीच धार चढणार आहे. मराठा समाजाच्या मनातील आंदोलनाची धग शांत करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न आहेत. त्यातील पहिला प्रयत्न म्हणजे मराठा समाजातील समाजासाठी ईडब्ल्यूएस आरक्षण जाहीर करण्यात आले. दुसरा प्रयत्न म्हणजे आरोग्य विभागातील जम्बो भरतीत एसईबीसी (सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास) प्रवर्गातील उमेदवार ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहे.
ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.