आरोग्य व्यवस्थेतील जनसामान्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यात सतर्क पोलीस टाईम, आरोग्य हक्क कृती समिती व मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांचा उपोषणास पाठिंबा व समर्थन – भूषण मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, सावंतवाडी व शिरोडा असे तीन उपजिल्हा रुग्णालय आहेत. इतर दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या सोयी सुविधा व शिरोडा हॉस्पिटल मधील सोयी सुविधा याचा तुलनात्मक अभ्यास केला तर शिरोडावासीय हे गेली अनेक दशके आदिवासी किंवा नक्षली क्षेत्रात खितपत पडले असल्याची जाणीव होत आहे. जिल्ह्यात चांगले दर्जेदार तज्ञ डॉक्टर्स जर इतर दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त केले जातात तर केवळ शिरोडा SDH याला अपवाद का ? असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयात १०/१२ डॉक्टर्स ची गरज असताना आणि विशेषतः एमबीबीएस फिजिशिअन ची अत्यंत गरज असूनही जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग नागरिकांच्या जीवावर उठलय असं चित्र निर्माण झालं आहे. केवळ २/४ डॉक्टर्सची नियुक्ती करून हॉस्पिटल चालविणे आणि महामारीच्या काळात रुग्णांना त्यांच्या हक्काच्या सेवा देणे हे कसे शक्य आहे ? असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न सतावत आहे.
दररोज कोरोना रुग्णांची वाढ होत असून शिरोडा SDH च्या जवळील १०/१२ गावातील जवळपास ३०,००० पेक्षा जास्त नागरिकांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहे. शिरोडा परिसरात ३०० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण संख्येच्या तुलनेत केवळ १८ ऑक्सिजन बेड कसे पुरणार ही साधी गोष्ट प्रशासन व स्थानिक नेत्यांना कळत नाही हे दुर्दैव आहे.
परिसरात कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ५० ऑक्सिजन बेडची तात्काळ गरज असून संपूर्ण तालुक्यात एकही व्हेंटिलेटर नाही यापेक्षा दुर्दैव कोणतेच असू शकत नाही. कणकवली व सावंतवाडी या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १०/१० व्हेंटिलेटर बेड सध्या चालू असून प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निष्क्रियतेमुळे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे असे दिसून येते. त्यामुळे नागरिक हे आरोग्य व्यवस्थेपासून वंचित असून ते त्रस्त झाले आहेत. जर शासकीय नियमानुसार तिन्ही SDH चा दर्जा समान निश्चित केला असेल तर फक्त शिरोडा उपजिल्हा रुग्णालयावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात की राजकारण केलं जातं आहे ? अशी भावना नागरिकांमध्ये झाली असून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनान व जिल्हा आरोग्य विभागाने या गंभीर व संवेदनशील समस्यांची तात्काळ दखल घेऊन येत्या आठवड्याभरात आरोग्य विषयक प्रश्न मार्गी न लावल्यास भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभाग व शिरोडा पंचक्रोशीतील नागरिकांना सोबत घेऊन कोरोना नियमांचे पालन करून दिनांक २जुलै २०२१ रोजी सकाळी ९.३० वा.पासून मा. तहसीलदार कार्यालय, वेंगुर्ला येथे बेमुदत आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार असून त्याबाबतचे मुद्देनिहाय निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार वेंगुर्ला, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका वैद्यकीय अधिकारी वेंगुर्ला, वेंगुर्ला पोलीस ठाणे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे सहसचिव विश्वनाथ @सिद्धेश शेलटे यांनी दिली.
मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट, सिंधुदुर्गचे अध्यक्ष भूषण मांजरेकर यांनी जिल्ह्या व तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील जनहिताच्या लढ्यातील बेमुदत आत्मक्लेश उपोषणास सतर्क पोलीस टाईम्स, आरोग्य हक्क कृती समिती व मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांचा पूर्ण पाठिंबा व समर्थन असल्याचे सांगितलं आहे.