जिल्ह्यात 3 हजार 661 घरांना मंजुरी, 2 हजार 948 घरकुल पूर्ण, 713 प्रगतीपथावर
जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक चौघांना चावी वितरित
सिंधुदुर्गनगरी
महा आवास अभियान – ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमात स्वतःच्या घरात प्रवेश करणाऱ्या लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतानाच, मिळालेले घर कोरोना मुक्त ठेवावे, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, महिला व बाल विकास सभापती शर्वनी गावकर आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील चौघा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक चावीचे वितरण करण्यात आले.
कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येतील गजानन श्रीधर घाडीगावकर यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची चावी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कणकवली तालुक्यातील नाटळ येथील संजना सिद्धार्थ तांबे यांना रमाई आवास योजनेतील घरकुलाची चावी महिला व बाल विकास सभापती श्रीमती गावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील मारुती आत्माराम पाताडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची चावी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नायर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील मोहन आत्माराम पाताडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची चावी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. पराडकर यांच्या हस्ते देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 हजार 661 घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 3 हजार 646 घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. एकूण 2 हजार 948 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 713 प्रगतीपथावर आहेत. आज अखेर 278 भूमिहिन लाभार्थ्या्ंना जमीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. नव्या घरात प्रवेश करणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देतानाच घर कोरोनामुक्त, स्वच्छ ठेवा, निरोगी आणि आनंदी रहा असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जगदीश यादव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी विक्रांत गावडे आदी उपस्थित होते.